परंपरेला आधुनिकतेचा साज

गायत्री डोंगरे


मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यातील शेती संबंधित असा सण आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. संक्रांत म्हणजे फक्त एक सण नाही, तर एका संक्रमणाची सुंदर जाणीव.थंडीचा कडाका कमी होऊन सूर्य उत्तरायणाला वळतो. हे सण उत्सव आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेले असे आहेत त्यामुळे आपले खाणे-पिणे पोशाख यातसुद्धा या सणांच्या दिवशी बदल आपण करतो.


संक्रांत येते हिवाळ्यात! त्यावेळी हवामान थंड असतं त्यामुळे आपल्या शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो! संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंगभाज्या, फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते. तेव्हा आपल्या आहारात उष्णता देणारे पदार्थ येतात.


संक्रांतीला हेच पदार्थ का करतात?


तिळगूळ : तीळ शरीराला उष्णता देतात, तर गूळ शक्ती वाढवतो. हिवाळ्यात होणारा अशक्तपणा, सांधेदुखी यावर तिळगूळ उपयोगी ठरतो. “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” ही केवळ म्हण नाही, तर नात्यांमध्ये गोडवा जपण्याची शिकवण आहे.
तीळ लाडू / तिळाच्या वड्या : सोप्या, टिकाऊ
आणि पौष्टिक. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालणारा पदार्थ.
गुळाची पोळी / पुरणपोळी : ऊर्जा देणारा गूळ आणि तूप यांचा सुंदर संगम. सणासुदीला घरात
सुगंध दरवळतो.
आजच्या काळात थोडा बदल…
आज अनेक जण डायबेटिक किंवा आरोग्याबाबत जागरूक आहेत. त्यामुळे गूळ मर्यादित प्रमाणात किंवा खजूर, अंजीर वापरून लाडू,तीळ +ड्रायफ्रूट्सचे छोटे एनर्जी बॉल्स, असे पर्यायही आपण करू शकतो.
वेगवेगळ्या राज्यांतील पारंपरिक पदार्थ :
महाराष्ट्र – तिळगूळ, तीळ लाडू, गुळाची पोळी
गुजरात – उंधियू, जलेबी, पंजाब – रेवडी, गजक
तामिळनाडू – गोड व खारट पोंगल
आंध्र प्रदेश – अरिसेलू (तांदळाचे गोड पदार्थ)


हे पदार्थ केवळ चवीसाठी नाहीत, तर हिवाळ्यात शरीराला आवश्यक उष्णता देण्यासाठी महत्त्वाचे आहेत.


भारतात वेगवेगळ्या राज्यांत संक्रांत वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजरी होते. प्रांत बदलला तरी सणामागचा हेतू एकच — निसर्गाबद्दल कृतज्ञता आणि नव्या ऋतूचे स्वागत.


या सणाच्या उत्सवात स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. घर सजवणं, पारंपरिक पदार्थ प्रेमाने तयार करणं, स्नेहाने ते वाटणं—या सगळ्यात तिची माया आणि कष्ट दिसून येतात. मात्र आजही काही ठिकाणी जुन्या रूढी-परंपरांमुळे विधवा महिलांना सणाच्या आनंदापासून दूर ठेवलं जातं. सण हा आनंद, एकत्र येणं आणि आपुलकी वाटण्याचा असतो; मग त्यातून कुणालाही वगळणं योग्य कसं ठरेल? आजच्या काळात संक्रांत साजरी करताना समावेशकतेचा विचार होणे गरजेचे आहे. पूर्वी अनेक सामाजिक बंधनांमुळे विधवा महिलांना सण-समारंभांपासून दूर ठेवले जात होते. मात्र आता ही मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. हा बदल आपल्या पासूनच करायला हवा..त्यांनाही हळदीकुंकू, स्नेहभेटी, सहभाग आणि सन्मान मिळायला हवा. सणाचा खरा अर्थ कोणालाही वगळणे नाही, तर सगळ्यांना सोबत घेणे हाच आहे.

Comments
Add Comment

साहित्यिक कर्मयोगिनी

कर्तृत्ववान ती राज्ञी : चित्रा कुलकर्णी मराठी साहित्यविश्वात गेली अनेक वर्षे निष्ठेने, सातत्याने आणि सामाजिक

स्वतःची किंमत ओळखा

मीनाक्षी जगदाळे लोकांनी तुम्हाला 'चांगले' म्हणावे यापेक्षा लोकांनी तुमचा 'आदर' करावा हे जास्त महत्त्वाचे आहे.

योग : अंध:काराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्ग 

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके योगिनींनो, म्हणता म्हणता २०२५ हे वर्ष सरलं आणि निरोप घ्यायची वेळ आली सुद्धा.

ओट्स–दुधाची खीर (डायबेटिक-फ्रेंडली)

सुग्रास सुगरण :  गायत्री डोंगरे मधुमेही देखील खाऊ शकतील अशी ओट्स–दुधाची खीर. साधी आहे, पचायला हलकी आहे आणि

कलमधारिणी वीर नारी

मोहिनी गर्गे - कुलकर्णी : कर्तृत्ववान ती राज्ञी वैशाली गायकवाड आयुष्याचा प्रवास कधीही सरळ रेषेत नसतो; तो

प्रसूतीनंतर आई व बाळामधील त्वचा-ते-त्वचा संपर्क

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील प्रसूती हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अत्यंत भावनिक व जैविकदृष्ट्या महत्त्वाचा