मापगाव बंगला सशस्त्र दरोड्यात २० लाखांचा ऐवज लंपास

संशयित पोलिसांच्या ताब्यात, उर्वरित आरोपींचा शोध सुरू


अलिबाग : मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुशेत परिसरात मध्यरात्री कुक्कुट खाद्यनिर्मिती कंपन्यांमध्ये अग्रेसर असलेल्या कुकूचकू कंपनीचे मालक दिलीप पाथरे यांच्या बंगल्यावर तब्बल नऊ सशस्त्र दरोडेखोरांनी फिल्मीस्टाईल दरोडा टाकत २० लाख रुपयांचा ऐवज लुटला. या घटनेनंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या वॉल कंपाऊंडवरील तारेचे कुंपण तोडून कंपाऊंडमध्ये प्रवेश केला. स्लायडिंग विंडो उघडून लोखंडी ग्रीलचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडत त्यांनी घरात घुसखोरी केली. विशेष म्हणजे, बंगल्याच्या आवारात श्वान मोकळे असतानाही कोणताही आवाज न होता, हा धाडसी दरोडा टाकण्यात आला. पाथरे यांच्या बंगल्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत; परंतु, घराच्या मुख्य द्वारावरच हे कॅमेरे आहेत आणि ते देखील बंद अवस्थेत आहेत. यामुळे दरोडेखारांचे फावले असल्याची चर्चा आहे.


घरात प्रवेश करताच दरोडेखोरांनी चिमुकल्या आयान पाथरेला शस्त्राचा धाक दाखवत बाहेर नेले आणि मोबाईलवरून घरातील साथीदारांशी संपर्क साधत मुख्य दरवाजा आतून बंद करून कटावणी अडकवण्यात आली. झोपेत असलेल्या कुणाल पाथरे व त्यांच्या पत्नी विनिता पाथरे यांना शस्त्रांच्या धाकात ठेवून त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतण्यात आले. आपला मुलगा दरोडेखोरांच्या ताब्यात आहे, हे कळताच त्याचा जीव वाचवण्यासाठी कुणाल पाथरे यांनी प्रसंगावधान राखून वडील दिलीप पाथरे यांना सांगून घरातील दागिने व रोख रक्कम असा सुमारे २० लाखांचा ऐवज दरोडेखोरांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. तरीही समाधान न झाल्याने दरोडेखोरांनी तळघर दाखवण्याची मागणी करत घरातील फोटो, साहित्याची तोडफोड करीत सर्वत्र शहानिशा केली. मात्र, त्यांच्या हाती अधिक काहीच लागले नाही. तब्बल एक तास सुरू असलेल्या या दहशतीनंतर दरोडेखोर चारचाकी वाहनाने पसार झाले.


घटनेनंतर पाथरे कुटुंबीयांनी अलिबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तातडीने पोलीस पथक, फॉरेन्सिक टीम आणि पोलीस निरीक्षक किशोर साळे घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनीही घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांना धीर दिला. तपासादरम्यान दरवाजाला अडकवलेली कटावणी सापडली असून, त्यावरील पांढऱ्या कागदावर इंग्रजीत 'डीएआर' असे शब्द लिहिलेले आढळले. सीसीटीव्ही फुटेज व वाहन क्रमांकाच्या आधारे तपासाला वेग देण्यात आला असून, काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या थरारक आणि धाडसी दरोड्यामुळे जिल्हा मुख्यालयाजवळील परिसरातही नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

Comments
Add Comment

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

ग्रीन सी प्रजातीच्या कासवाला दिले जीवदान

कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच आढळले हिरवे नर कासव श्रीवर्धन : श्रीवधर्नच्या कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच

भटक्या श्वानांचे होणार सर्वेक्षण

अशी असणार शिक्षकांवर जबाबदारी अलिबाग : आधीच अनेक अशैक्षणिक कामाचे ओझे असताना आता प्राथमिक शिक्षकांवर श्वान

मंगेश काळोखे हत्या प्रकरणात २० लाखांची सुपारी देऊन हत्या

पुणे कनेक्शन उघड, १२ आरोपी अटकेत अलिबाग : खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निघृण

सबळ पुराव्यांअभावी आदिवासींचे वनहक्क दावे फेटाळले

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ६ हजार ६५६ जणांचे वनहक्क दावे मंजूर करण्यात आले असून, १ हजार ८०४ दावे फेटाळण्यात आले.

रायगड गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कामगिरी, ११ महिन्यांत ८९ गुन्ह्यांची उकल

अलिबाग (प्रतिनिधी) : सरत्या २०२५ या वर्षात रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दमदार कामगिरी केली