पदाधिकाऱ्यांनाही विधानसभा मतदारसंघ निहाय जबाबदाऱ्या
नेत्यांची फळीही केली अधिक सक्रिय
पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्रभारी म्हणून खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडे सर्वप्रथम जबाबदारी देण्यात आली. वसई-विरारचे निवडणूक प्रमुख म्हणून आमदार राजन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि माजी खासदार पुनम महाजन यांच्यावर सुद्धा विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील भाजप नेत्यांना विधानसभा निहाय जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
विरार : वसई-विरार महापालिकेच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक असावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. वसई-विरारमधील भावी नगरसेवकांसाठी पालघर जिल्ह्यातील तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीमध्ये निवडून आलेले भाजपचे नवे नगरसेवक देखील आता प्रचारात उतरले आहेत. तसेच आमदार हरिश्चंद्र भोये, पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, पालघर निवडणूक प्रमुख बाबाजी काठोके यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना विधानसभा मतदारसंघ निहाय प्रभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. वसई-विरार महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुती म्हणून लढत आहे. श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेला सुद्धा महायुतीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. महापालिकेच्या ११५ जागांपैकी ८८ जागा भाजप स्वतंत्र लढवित असून, चार जागांवर मैत्रीपूर्ण लढत होत आहे. दरम्यान, भाजपने नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन नगराध्यक्षांसह ५० नगरसेवक निवडून आणले आहेत. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम भाजपने केले आहे. वसई-विरारमध्ये सुद्धा पक्ष वाढीसाठी कार्य करणाऱ्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भाजपने महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, माजी विधानसभा प्रमुख मनोज पाटील, महामंत्री विश्वास सावंत, उपाध्यक्ष नारायण मांजरेकर, युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके, प्रदेश सचिव अपर्णा पाटील, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष मॅथ्यू कोलासो, सरचिटणीस विजेंद्र सिंग, युवा मोर्चा आघाडी अध्यक्ष विनित तिवारी, वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर, विरार पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष मनीष वैध, वसई पूर्व वालीव मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नालासोपारा तुळींज मंडळ अध्यक्ष प्रमोद सिंग, विरार पश्चिम मंडळ अध्यक्ष विशाल राऊत, वसई ग्रामीण पश्चिम अध्यक्ष आशीष जोशी यांच्या पत्नी मनिषा जोशी यांच्यासह उत्तम कुमार, रवी पुरोहित, गौरव राऊत, जॉन बावटीस, युगा वर्तक, स्मिता लोपीस, मेहुल शहा, राजीव म्हात्रे, पिंकी कवर-राठोड, ॲड. दर्शना त्रिपाठी, दीपा चावडे, गणेश पाटील, कमलेश खटावकर, नीतू झा, सुचिता शेट्टी, श्रमजीवीचे महेश धांगडा आणि आगरी सेनेच्या विजय घरत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता याच कार्यकर्त्यांना नगरसेवक बनविण्यासाठी भाजपने विविध समित्या तयार केल्या आहेत.
या समित्यांवर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. केवळ वसई-विरारमधील रहिवासी असलेल्या पदाधिकाऱ्यांनाच नव्हे तर जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना महापालिका निवडणुकीसाठी सज्ज करण्यात आले आहे. नुकताच निवडून आलेल्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या ५० नगरसेवकांवर सुद्धा प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.