मीनाक्षी जगदाळे
लोकांनी तुम्हाला 'चांगले' म्हणावे यापेक्षा लोकांनी तुमचा 'आदर' करावा हे जास्त महत्त्वाचे आहे. स्वतःची गरज, स्वतःला प्राधान्य देणे म्हणजे स्वार्थी असणे नव्हे, ते आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे.
स्वतःभोवती बाउंड्रीज किंवा सीमा सेट करणे ही एक प्रक्रिया आहे. यासाठी केवळ इच्छा असून चालत नाही, तर काही महत्त्वाचे आंतरिक आणि बाह्य घटक तुम्हाला मदत करतात. काही महत्त्वाचे घटक मर्यादा सेट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. प्रथम आपण बघू आत्म-जाणीव म्हणजे काय आणि त्याचा उपयोग या कामात कसा होऊ शकतो?
बाउंड्रीज सेट करण्यापूर्वी तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की, तुमच्या मर्यादा काय आहेत. काहीही करण्याआधी, कोणताही निर्णय घेण्याआधी स्वतःच्या मर्यादा समजावून घ्या.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे भावनांचा मागोवा! जेव्हा कोणी तुमच्याशी बोलतं किंवा वागतं, तेव्हा तुम्हाला राग, अस्वस्थता, त्रास, चिडचिड, तणाव किंवा थकवा जाणवतो का? या भावना तुम्हाला सांगतात की तिथे बाउंड्रीची गरज आहे. अनेकदा असे होत असते की काही विशिष्ट लोकांशी बोलताना किंवा बोलावे, भेटावे लागणार आहे या जाणीवेमुळे सुद्धा आपल्याला तणाव वाटतो, त्यांना कस टाळता येईल, बोलण्यात आटोपते कसे घेता येईल याकडे आपला कल असतो, काही लोकांचा फक्त फोन आला, मेसेज आला तरी आपल्या हातापायला कंप सुटतो, घाबरल्यासारखं होतं. ही लक्षणं दर्शवतात की इथे सीमारेषा आखण्याची गरज आहे.
तुमची मूल्ये म्हणजे तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे काय आहे? (उदा. प्रामाणिकपणा, खरेपणा, आरोग्य, शांतता, स्थिरता, स्वतःसाठी वेळ) त्यानुसार तुमची मूल्येच तुमच्या
सीमा ठरवतात.
स्पष्ट संवाद कौशल्य ही खूप मोठी ताकद असून ती प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे. तुम्ही काय म्हणता यापेक्षा ते कसे म्हणता, याला महत्त्व आहे. संवाद आपल्या आयुष्यातील अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण घटक आहे. 'मी' विधाने (I Statements)"तू नेहमी उशिरा येतोस" असे म्हणण्याऐवजी, "जेव्हा लोक उशिरा येतात तेव्हा मला माझ्या वेळेचा अपमान झाल्यासारखे वाटते," असे म्हणणे अधिक
प्रभावी ठरते.
शांत पण ठाम आवाज वाद न घालता, घोळ घालत, स्पष्टीकरण देत न बोलता पण नम्रपणे आपली बाजू मांडणे बाउंड्रीज टिकवून ठेवण्यास मदत करते. आपण जितके शांत, मृदू, कमी आवाजात, कमी शब्दात, विचार पूर्वक आणि मोजकं पण महत्त्वाचं बोलतो तितका आपला प्रभाव समोरील व्यक्ती वर पण चांगला पडतो आणि ती व्यक्ती पटकन आपल्याला ओरडून, उलट, कंगावा करत बोलू शकत नाही. खूप बडबड करत राहणे, संदर्भ हीन बोलणे, कोणत्याही बोलण्यात कोणताही विषय घुसवणे आपण पण टाळावे आणि समोरच्या व्यक्तीला पण अनावश्यक बोलू देऊ नये. आपल्या बोलण्यात आणि आवाजात आणि आपण जे बोलत आहोत त्या संवादात इतका दबदबा असणे गरजेचं आहे की आपण बोललेल्या मोजक्या शब्दात लोकं जे समजायचं ते समजू शकतील.
स्वतःची किंमत ओळखणे महत्त्वाचे आहे.
जोपर्यंत तुम्हाला असे वाटत नाही की तुमचा वेळ, तुमच्या भावना आणि तुमची ऊर्जा मौल्यवान आहे, तोपर्यंत तुम्ही बाउंड्रीज सेट करू शकणार नाही. जेव्हा तुमचा आत्मसन्मान वाढतो, तेव्हा 'नाही' म्हणणे सोपे जाते. यासाठी सगळ्यांनाच आणि सतत नाही म्हणत राहण्याची गरज नाही तर आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्व, भावना, स्वभाव, अपेक्षा, आपला मान सन्मान याच्या आदर दाखवणाऱ्या, किंमत जाणणाऱ्या, आपल्याला समाधान आनंद तथा नवीन शिकण्याची संधी देणाऱ्या गोष्टीना नक्कीच हो म्हणावे पण त्याआधी त्याचा सर्वांगीण अभ्यास जरूर करावा. कौटुंबिक, घरगुती बाबतीत सुद्धा हा नियम पाळायला हरकत नाही कारण तुम्हाला सगळ्यात जास्त गृहीत धरणारे तुमच्या घरचेच असतात. कोणीही उठून तुम्हाला काहीही बोलेल, कसे ही बोलेल इतकं स्वस्त घरात पण बनू नका. स्वतःसाठी स्टँडर्ड सेट करा जेणेकरून लोकं विचार करूनच तुमच्याशी बोलतील.
अपराधीपणाच्या भावनेवर नियंत्रण आणणे बाउंड्रीज सेट करतांना खूप महत्वाचे आहे. अनेकदा एखाद्याला वाईट वाटू नये, कोणी दुखावू नये म्हणून आपण आपल्याला पटो न पटो अनेक गोष्टी गळ्यात मारून घेत असतो. सुरुवातीला बाउंड्रीज सेट करताना "मी समोरच्याला दुखावत तर नाही ना?" असा विचार करून अपराधी वाटते. अशा वेळी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वार्थीपणा नाही. अपराधीपणाला बाजूला सारून स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे हा एक मोठा घटक आहे अन्यथा आपला मानसिक कोंडमारा सतत सुरू राहतो. सतत इतरांना खूश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतः कायम दुःखी राहतो हे जाणून घ्या. जगात कोणीही असे नाही जे एकावेळी सगळ्यांना आनंदी ठेवू शकेल. असे करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही थकून जाल पण सामोरची व्यक्ती कधीच पूर्ण समाधानी
होणार नाही.
सातत्य जसे की बाउंड्रीज एकदा ठरवून चालत नाहीत, त्या सतत पाळाव्या लागतात. जर तुम्ही एकदा एखाद्याला सूट दिली, तर लोक पुन्हा तुमच्या सीमा ओलांडू शकतात. म्हणजेच तुमचे नियम स्वतःसाठी कडक असणे आवश्यक आहे. तुमच्या वागण्यात जेवढे सातत्य असेल, तेवढ्या लवकर लोक तुमच्या सीमांचा आदर करायला शिकतील. आपणच तयार केलेल्या आपल्याच मर्यादा जर आपणच शिथिल केल्या, तर लोकांना त्याचं गांभीर्य समजत नाही आणि आपली स्वतःबद्दल तयार केलेली प्रतिमा डळमळीत होते. चालतं रे, चालून जातं, होऊन जाईल, काही होत नाही, करेलच तो किंवा ती, ती नाही मनावर घेत, तिला काय एवढं घाबरायचं, त्याला सगळं चालतं थोडे नाटक करतो फक्त, आपलाच आहे, आपल्याला नाही म्हणणार नाही, त्याला कसल्या आल्या मर्यादा, तो काय तो कधीही कुठेही येतो, अरे तो पैसे द्यायला कधीच नाही म्हणत नाही अशी विधान इतरांच्या तोंडी जर तुमच्या बद्दल असतील, तर ती धोक्याची घंटा आहे.
सपोर्ट सिस्टम आयुष्यात खूप गरजेची आहे. असे मित्र किंवा मार्गदर्शक तुमच्या सोबत असणे जे तुमच्या निर्णयाचा आदर करतात आणि तुम्हाला नेहमीच प्रोत्साहन देतात ते गरजेचे आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या बाउंड्रीजचा अनादर करते, तेव्हा तुमची सपोर्ट सिस्टम तुम्हाला मानसिक आधार देते. आपली बाउंड्री ही कोणालाही त्रास द्यायला, उद्धटपणा दाखवायला अथवा मीपणा दाखवायला नसून ती आपल्या कंफर्टसाठी आहे आणि सगळ्यांना सारखीच लागू आहे हे मानणारे निष्ठावान लोकं तुमच्या सोबत असणे गरजेचे आहे. परिणाम निश्चित करणे अपेक्षित आहे. बाउंड्री सेट करताना ती ओलांडली गेल्यास काय होईल, हे स्पष्ट असणे आवश्यक आहे.
उदा. "जर तू माझ्याशी ओरडून बोलणार असशील, तर मी हा संवाद इथेच थांबवेन." आणि प्रत्यक्ष तसे करणे, हा बाउंड्रीचा महत्त्वाचा घटक आहे. यापैकी कोणता घटक तुम्हाला सर्वात कठीण वाटतो? त्यावर विचार करणे आणि आपल्याला काय सहज जमू शकते, सहन होऊ शकते, दोघांच्या हितासाठी काय योग्य आहे हे तपासून तसें वागता आले पाहिजे. 'तू माझे आधीचे घेतलेले पैसे परत दे तोपर्यंत मी तुला पुन्हा पैसे देऊ शकत नाही'. हे बोलणे म्हणजे असे वागणे दोघांच्या ही फायद्यासाठी आहे. पैसे घेणारा पण व्यवहाराला महत्त्व द्यायला शिकतो, आपलं आर्थिक नुकसान पण होत नाही आणि नातेसंबंध पण टिकून राहतात.
बाउंड्रीज सेट करण्याबाबत जागतिक स्तरावर ओप्रा विन्फ्रे (Oprah Winfrey) यांचे उदाहरण अत्यंत प्रेरणादायी मानले जाते. ओप्रा या जगातील अत्यंत यशस्वी आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत, पण त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांना 'नाही' (No) म्हणायला खूप त्रास व्हायचा. त्यांना नेहमी इतरांना खूश ठेवण्याची सवय होती. या विषयावर त्यांनी स्वतःचे अनुभव मांडले आहेत, जे बाउंड्रीजचे महत्त्व स्पष्ट करतात.
ओप्रा विन्फ्रे यांचे उदाहरण द्यायचे तर -
ओप्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, करिअरच्या सुरुवातीला त्या कोणालाही 'नाही' म्हणू शकत नसत. कोणीही मदतीसाठी आले की त्या स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून त्यांना मदत करायच्या, अगदी स्वतःचा त्रास करून घेऊनही. त्यांना सतत भीती वाटायची की जर मी नाही म्हटले, तर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील किंवा त्यांना मी वाईट वाटेल.
एकदा त्यांना एका व्यक्तीने मोठ्या रकमेची देणगी मागितली. ओप्रा यांना ती देण्याची इच्छा नव्हती आणि तशी परिस्थितीही नव्हती, तरीही त्यांनी 'हो' म्हटले. त्या रात्री त्यांना इतकी अस्वस्थता जाणवली की त्यांना समजले की, त्यांनी स्वतःचा आणि स्वतःच्या निर्णयाचा अपमान केला आहे.
बाउंड्री सेट करण्याची शिकवण
त्यानंतर ओप्रा यांनी ठरवले की, त्या केवळ अशाच गोष्टींना 'हो' म्हणतील ज्या त्यांच्या मनाला पटतील. त्यांनी एक प्रसिद्ध वाक्य म्हटले आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाही, तोपर्यंत जग तुमच्या वेळेला आणि कामाला महत्त्व देणार नाही ओप्रा यांनी बाउंड्रीज कशा सेट केल्या? डिस्कनेक्ट होणे म्हणजे ओप्रा दररोज स्वतःसाठी ठराविक वेळ बाजूला ठेवतात, ज्यामध्ये त्या जगाशी संपर्क तोडतात त्या वेळी कोणीही त्यांच्या वैयक्तिक अवकाशात (स्पेस) हस्तक्षेप करू शकत नाही. स्पष्ट संवाद जसे की त्यांनी लोकांना हे स्पष्ट केले की, त्या प्रत्येक कार्यक्रमाला किंवा लग्नाला येऊ शकत नाहीत. त्यांनी 'नाही' म्हणताना स्पष्टीकरण देणे बंद केले. 'No' is a complete sentence (नाही हे स्वतःत एक पूर्ण वाक्य आहे), हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांनी हे ओळखले की त्यांची ऊर्जा मर्यादित आहे. जर त्यांनी ती चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या लोकांसाठी खर्च केली, तर त्या त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत.
ओप्रांचे उदाहरण शिकवते की लोकप्रियता विरुद्ध आदर. लोकांनी तुम्हाला 'चांगले' म्हणावे यापेक्षा लोकांनी तुमचा 'आदर' करावा हे जास्त महत्त्वाचे आहे. स्वतःची गरज, स्वतःला प्राधान्य देणे म्हणजे स्वार्थी असणे नव्हे, तर ते आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे.
यश आणि बाउंड्रीज तुम्ही जितके यशस्वी व्हाल, तितके लोक तुमच्या वेळेवर हक्क सांगतील. त्यामुळे बाउंड्रीज अधिक कडक असणे गरजेचे आहे. तुम्हाला असे वाटते का की, इतरांना 'खुश' करण्याच्या नादात तुम्ही स्वतःच्या बाउंड्रीज विसरता तर तुम्हाला गरज आहे यावर एखादी विशिष्ट कृती योजना तयार करण्याची. त्यामुळे स्वतःवर, स्वतःसाठी विचार करायला सुरुवात करा अन्यथा आयुष्याच्या शेवटी जानवेल की आपण स्वतःसाठी जगलोच नाही!