प्रतिनिधी: बँक कर्मचारी संपाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहे कारण युनियन फोरम ऑफ बँक युनियन (UFBU) ही कर्मचारी संघटना २७ जानेवारीला संप पुकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना युनियनने हा इशारा दिला असून सरकारने यावर वेळेवर तोडगा काढावा ही मागणीही केली आहे. अनेक दिवस कर्मचाऱ्यांसाठी असलेले कामकाजासाठी वातावरण व वेतन भत्ते यांच्यात सुधारणा व ५ दिवसांचा आठवडा करावा या तीन प्रमुख कारणांसाठी संप पुकारण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. जर २७ जानेवारीला संप झाल्यास, २५ व २६ जानेवारीला सुट्टी असल्याने सलग ३ दिवस बँकेला सुट्ट्या लागू शकतात.
या कारणामुळे बँक ग्राहकांच्या गैरसोयीत आणखी वाढ होऊ शकते दरम्यान सरकारने यावर काही तोडगा काढल्यास संप पुकारावा का नाही याचाही निर्णय युनियन करू शकते. पाच दिवसांचा आठवडा करावा ही बँकाची प्रमुख मागणी असून कामाच्या वातावरणात बदल व्हावा, कामकाजातील सुधारणेसह वेतनात भरत पडावी व बँकिंग कर्मचारी नियमावलीतही परिवर्तन व्हावे अशी मागणी बँकिंग युनियन संघटना करत आहे. या संपात मधल्या पातळीच्या कर्मचाऱ्यासह क्लर्क सहभागी होऊ शकत असल्याने कॅश व्यवहार व बँकिंग आस्थापनेतील आवश्यक व्यवहारासाठी ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. विश्लेषकांचा मते, बँकेच्या मार्जिनमध्ये घसरण होत असताना व बँक ऑपरेशनल खर्चातही भर पडत असताना वेतनात वाढ झाल्यास बँकेच्या खर्चावरही अधिकचा भार पडू शकतो.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कर्मचारी संघटना आणि बँक व्यवस्थापन यांच्यातील वेतनवाढीवरील चर्चा अनेक महिन्यांपासून कोणत्याही तोडग्याशिवाय रखडली आहे. संघटनांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, सध्या चर्चेसाठी मांडलेले प्रस्ताव वाढती महागाई किंवा आघाडीच्या कर्मचाऱ्यांवरील वाढता कामाचा ताण हे सध्याच्या वेतनाशीही सुसंगत नाहीत.
या संघटना सगळ्याच श्रेणींतील बँक कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक वेतनवाढ, तसेच उच्च भत्ते, अधिक मजबूत नोकरीची सुरक्षा उपाययोजना आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, महामारीनंतरच्या बँकिंगमुळे कामाचे तास वाढले आहेत, ग्राहकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि कामकाजाचा दबावही वाढला आहे, परंतु त्या प्रमाणात वेतनात सुधारणा झालेली नाही.प्रसारमाध्यमांशी बोलताना एका युनियन प्रतिनिधीने सांगितले की, 'वारंवार चर्चेच्या फेऱ्या होऊनही वाटाघाटींमध्ये कोणतीही बोलणीत मोठी प्रगती झालेली नाही आणि संप नोटीस देण्याचा उद्देश तोडगा काढण्यासाठी दबाव आणणे हा होता. संघटनांच्या नेत्यांनी इशारा दिला आहे की, २७ जानेवारीच्या अंतिम मुदतीपूर्वी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कर्मचारी संपावर जातील' असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
युनियनने दिलेल्या माहितीनुसार, बँकेची व्यवस्थापन मंडळ आणि सरकारी अधिकाऱ्यांनी संपाच्या सूचनेची पोचपावती दिली आहे,परंतु त्यांनी अद्याप सर्व युनियन मागण्या पूर्ण करण्याची जाहीर हमी दिलेली नाही. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बँकिंग सेवा बंद पडू नयेत यासाठी अधिकारी प्रयत्न करत असल्याने येत्या काही आठवड्यांत पुढील वाटाघाटी अपेक्षित आहेत परंतु यावर अद्याप अपेक्षित तोडगा निघालेला नाही. विश्लेषकांनी प्रसारमाध्यमांना म्हटल्याप्रमाणे, विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) बँकेला वाढत्या स्पर्धेत टक्कर देत असताना वबँकांवर कार्यक्षमता सुधारणे, कर्जपुरवठा वाढवणे आणि सेवेची गुणवत्ता सुधारण्याचा दबाव आहे.