मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी पात्र उमेदवारांना एक वर्षाची वयोमर्यादेतील शिथिलता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यामुळे केवळ वयोमर्यादा ओलांडल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या अनेक उमेदवारांना पुन्हा एकदा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
राज्यातील हजारो तरुण गेल्या अनेक वर्षांपासून एमपीएससी परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र कोरोना काळ, प्रशासकीय अडचणी आणि विविध कारणांमुळे परीक्षा वेळेवर न झाल्याने अनेक उमेदवारांचे वय कमाल मर्यादेपेक्षा अधिक झाले होते. यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना उमेदवारांमध्ये होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनांनी वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे. आयोगाच्या निर्णयानुसार ही वयोमर्यादेतील शिथिलता केवळ २०२४ मधील गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षांसाठी लागू असणार आहे.