गॅस सिलिंडर, ऑटो रिक्षा, सूर्यफूल लोकप्रिय
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणूक २०२५-२६ साठी अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या वतीने चिन्हांचे वाटप करण्यात आले. या उमेदवारांसाठी एकूण १९४ चिन्हांचा पर्याय ठेवण्यात आला होता.
चिन्ह वाटपात बहुतेक उमेदवारांनी गॅस सिलिंडर, ऑटो रिक्षा, सूर्यफूल, सीसीटीव्ही कॅमेरा, बॅग, सुटकेस यांना पसंती दिली. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या अर्जातील पहिल्या पसंतीचे चिन्ह उपलब्ध नसल्यास दुसऱ्या पसंतीचे चिन्ह देऊन अंतिम वाटप पूर्ण केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आयोगाने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आणि आज सर्व अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. रविवारपासून प्रचाराचा खऱ्या अर्थाने धुमाकूळ सुरू होणार आहे.
महापालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने तीन चिन्हांचे पर्याय उमेदवारी अर्जात दिले होते. ही चिन्हे १९४ चिन्हांच्या यादीतून निवडायची होती. उमेदवारांनी सर्वाधिक पसंती नेहमीच वापरात असलेल्या वस्तूंना दिली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी संपली. चिन्ह वाटप करण्याचा कार्यक्रम सर्वच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पार पडला. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनाही निवडणूक चिन्हे मिळाल्यामुळे उद्यापासून प्रचाराचा खऱ्या अर्थाने धूमधडाका सुरू होणार आहे.
“आमच्या भविष्यासाठी मतदान करा”:
मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. यासाठी नवी मुंबईतील दोन हजार विद्यार्थ्यांनी आपल्या पालक व नातेवाईकांना पत्र लेखन करून येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी महापालिका निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे शहरातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यंदा नवी मुंबई महापालिकेची निवडणूक चार आणि तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत पार पडणार आहे. मतदान प्रक्रियेत गोंधळ होऊ नये यासाठी महापालिकेने विविध स्वीप जनजागृती उपक्रम राबवले आहेत. याच अनुषंगाने, शाळा क्रमांक ३६ व १२२, कोपरखैरणे गाव येथे पालक व नातेवाईकांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पत्रलेखन उपक्रम राबविण्यात आला.






