AAP Sarpanch Shot in Amritsar : अमृतसरमध्ये थरार! लग्नमंडपात घुसून 'आप' नेत्याची डोक्यात गोळी झाडून हत्या; अवघ्या १३ सेकंदात आरोपी पसार

चंदीगड : पंजाबमध्ये गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना अमृतसरमध्ये घडली आहे. आम आदमी पार्टीचे सरपंच झरमल सिंग यांची एका लग्न समारंभात घुसून हत्या करण्यात आली. आता या घटनेचे अत्यंत भयानक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या खळबळजनक हत्येची जबाबदारी कुख्यात गँगस्टर डोनी बल, प्रभ दासुवाल आणि देवेंद्र बंबीहा ग्रुपने घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या कृत्याची कबुली दिल्याचे समजते. गँगस्टर राजवटीमुळे पंजाबमधील सामान्य जनता आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



नेमकं काय घडलं?



 समोर आलेल्या फुटेजमध्ये दिसते की, सरपंच झरमल सिंग लग्नात एका टेबलवर निवांत बसलेले आहेत. त्याच वेळी दोन सशस्त्र तरुण तिथे पोहोचतात. काहीही समजण्यापूर्वीच ते अत्यंत जवळून झरमल सिंग यांच्यावर गोळ्या झाडतात. गोळी लागताच सिंग खाली कोसळतात आणि हल्लेखोर शस्त्रांसह आरामात तिथून पसार होतात. ही संपूर्ण घटना काही सेकंदात घडली असून तिथे उपस्थित पाहुणेही स्तब्ध झाले होते.


आप सरपंचाच्या हत्येनंतर सुखबीर सिंग बादलांचा संताप


शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी पंजाब सरकारला धारेवर धरले आहे. "पंजाबमध्ये सध्या सार्वजनिक ठिकाणी हत्या होणे ही सामान्य बाब झाली आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. बादल यांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून सरकारवर टीकास्त्र सोडले. "सरपंच झरमल सिंग यांची हत्या ही एक अत्यंत चिंताजनक घटना आहे. पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रक्ताचा खेळ सुरू आहे. काल मोगामध्ये एका तरुणाची गोळी मारून हत्या करण्यात आली, तर शुक्रवारी कपूरथला येथे एका महिलेला लक्ष्य करण्यात आले. राज्यात 'टार्गेट किलिंग'चे सत्र सुरू असून जनता असुरक्षित आहे," असे बादल यांनी म्हटले आहे. या परिस्थितीला थेट मुख्यमंत्री भगवंत मान जबाबदार असल्याचा आरोप बादल यांनी केला. "पंजाबचे गृह मंत्रालय स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आहे, तरीही राज्यातील पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सार्वजनिक ठिकाणी दिवसाढवळ्या होणाऱ्या या हत्या पोलीस प्रशासनाच्या विदारक स्थितीचे दर्शन घडवतात. या प्रत्येक रक्ताच्या थेंबाला आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्यांना मुख्यमंत्री जबाबदार आहेत," अशी घणाघाती टीका त्यांनी केली.



३५ लाख देऊन माझं घर पाडलंत, आता हिशोब चुकता...


अमृतसरमधील 'मॅरी गोल्ड रिसॉर्ट'मध्ये आम आदमी पार्टीचे सरपंच झरमल सिंग यांची करण्यात आलेली हत्या ही पूर्ववैमनस्यातून आणि सूडबुद्धीने केल्याचे आता स्पष्ट होत आहे. या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात हल्लेखोरांनी सरपंचांच्या अत्यंत जवळ जाऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. मात्र, या घटनेनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टने पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. सरपंच झरमल सिंग यांच्या हत्येनंतर गँगस्टर डोनी बल याच्या नावाने एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये हत्येची जबाबदारी स्वीकारताना म्हटले आहे की, "मी (डोनी बल), प्रभ दासुवाल, अफरीदी टुट, मोहब्बत रंधावा, अमर ख्वा आणि पवन शौकीन या हत्येची जबाबदारी स्वीकारतो. हा गुन्हा आमचा छोटा भाऊ गंगा ठकरपुरिया याने केला आहे." हत्येचे कारण सांगताना पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, "या सरपंचाने पोलिसांना ३५ लाख रुपये दिले होते आणि पोलिसांना सोबत घेऊन तो दासुवालमधील माझे घर पाडण्यासाठी आला होता. त्याच गोष्टीचा हा बदला आहे."



पोलिसांना इशारा


या पोस्टमध्ये गँगस्टर्सनी पोलिसांनाही धमकीवजा इशारा दिला आहे. "आमच्या या कृत्यामुळे पोलिसांनी इतर कोणाही निष्पाप व्यक्तीला बेकायदेशीरपणे त्रास देऊ नये," असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. या पोस्टमुळे ही हत्या केवळ गँगवॉर नसून त्याला वैयक्तिक वादाची आणि प्रशासकीय कारवाईची किनार असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, सरपंच झरमल सिंग लग्नात बसलेले असताना हल्लेखोर त्यांच्या अगदी जवळ पोहोचले. कोणतीही चर्चा न करता थेट डोक्यात गोळ्या झाडून त्यांनी सिंग यांचा अंत केला. अत्यंत थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा खून करण्यात आल्याचे फुटेजवरून स्पष्ट होते.

Comments
Add Comment

सोनिया गांधी रुग्णालयात

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Hydrabad Crime : अमेरिकेत हैदराबादच्या लेकीची निर्घृण हत्या; संशयित माजी रूममेट भारतात पळाला, तामिळनाडूत अटक

हैदराबाद : अमेरिकेतील मेरीलँड राज्यात डेटा आणि स्ट्रॅटेजी ॲनालिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या निकिता गोडिशला (वय

चोरीसाठी शिरला, पण नशीब फिरलं! दोन दिवस भिंतीत अडकलेला चोर, VIDEO व्हायरल

चोरीसाठी चोर कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा काही अंदाज नाही. मात्र राजस्थानमध्ये चोरा सोबत असं काही घडलं की त्याला

लाल किल्ल्याजवळील स्फोटप्रकरणात एनआयएचा तपास वेगात; नऊ आरोपी अटकेत

नवी दिल्ली : लाल किल्ला स्फोट प्रकरणातील आरोपी यासिर अहमद दार याची कोठडी १६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ तटरक्षक दलाच्या ताफ्यात

जहाज आधुनिक अग्निशमन क्षमतांनी सुसज्ज; कोचीत राहणार तैनात पणजी : जहाजबांधणी आणि सागरी क्षमता विकासात

उमर खालिदला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : दिल्लीत २०२०च्या दंगलींशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय