मुंबई : जवळपास ७ ते ८ वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये राज्यभरात इच्छुकांची भाऊगर्दी दिसत असताना, मुंबई पालिका निवडणुकीतील इच्छुकांच्या संख्येत मात्र २४ टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीत मुंबईत २ हजार २७५ उमेदवार मैदानात उतरले होते. तर, यंदा १ हजार ७०० उमेदवार नगरसेवक पदाच्या शर्यतीत आहेत. देशातील सर्वात श्रीमंत आणि आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबईत ही निवडणूक शहराच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या अंतिम यादीतून ही माहिती समोर आली आहे. मुंबईत एकूण २ हजार २३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी ४५३ उमेदवारांनी माघार घेतली, तर १६७ अर्ज तांत्रिक कारणांमुळे अवैध ठरले. अशा प्रकारे अंतिम वैध उमेदवारांची संख्या १ हजार ७०० पर्यंत खाली आली. उमेदवारसंख्या कमी झाली असली, तरी मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये सरासरी ७.४९ उमेदवार मैदानात असल्याने स्पर्धा तीव्र राहणार आहे.
राज्यातील स्थिती काय?
राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांमध्ये एकूण २ हजार ८६९ नगरसेवक पदांसाठी १५ हजार ९३१ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. वैध ठरलेल्या २४ हजार ७७१ अर्जांपैकी ३५.७ टक्के (८,८४०) उमेदवारांनी माघार घेतली. मुंबईनंतर पुणे (१,१६६), नागपूर (९९३), छत्रपती संभाजीनगर (८५९) येथे उमेदवारांची संख्या जास्त आहे. नाशिकमध्ये माघारीचे प्रमाण सर्वाधिक (६६१) होते, तर पनवेलमध्ये सर्वात कमी (२५५) उमेदवार राहिले आहेत. राज्यात दीर्घकाळानंतर होत असलेल्या या महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी दिसली होती. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीने बंडखोरांना थंड करण्यात मोठे यश मिळवले.