Sunday, January 4, 2026

सकाळी सूर्य मोठा व तांबडा का दिसतो?

सकाळी सूर्य मोठा व तांबडा का दिसतो?

कथा : रमेश तांबे

सीता व नीता या दोघीही बहिणी खूपच जिज्ञासू होत्या. त्या दररोज त्यांच्या मावशीला प्रश्न विचारून आपली जिज्ञासा पूर्ण करून घेत असत. मावशीही आनंदाने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असे. ‘बरं मावशी, दररोज सकाळी उगवणारा सूर्य आपल्याला तांबडा दिसतो आणि आभाळसुद्धा लालसर दिसते.’ सीताने विचारले.

‘होय मावशी आणि रोज संध्याकाळीसुद्धा मावळणारा सूर्य आणि आकाश दोन्हीही लालतांबडे दिसतात.’ नीता म्हणाली. ‘मग असे का होते?’ दोघींनीही सोबतच विचारले. ‘सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी सूर्य व आकाश तांबड्या रंगाचे दिसतात, हे तुम्ही दररोज बघतच असता. आता आपण ह्या दोन्ही वेळी सूर्य तांबडा का दिसतो ते बघू. सकाळी सूर्योदयाच्या व संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी सूर्य हा क्षितीजाजवळ असतो. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा मार्ग जास्त लांबीचा म्हणजे जास्त अंतराचा असतो. त्यामुळे सूर्यकिरणांना धूलिकणांच्या लांब व मोठ्या थरातून यावे लागते. यावेळी कमी तरंग लांबीच्या निळ्या व जांभळ्या रंगाच्या प्रकाशाचे जास्त प्रमाणात विकिरण होते. त्यामुळे निळ्या व जांभळ्या रंगाचा प्रकाश विखरून विखरून नाहीसा होतो आणि तांबडा रंग शिल्लक राहतो. म्हणून ह्या दोन्ही वेळी आपणाला सूर्य तांबडा दिसतो.तांबड्या सूर्यामुळे आकाशालाही लालसर तांबडा रंग येतो.’ मावशीने सांगितले.

‘मावशी! दररोज सकाळी सूर्य उगवताना आपणास सूर्यगोल मोठा का दिसतो?’ नीताने विचारले. ‘खरंच मावशी, संध्याकाळी मावळतानाही सूर्यबिंब नेहमीपेक्षा थोडे मोठेच दिसतात.’ सीताने दुजोरा दिला. ‘तुम्ही दोघींनीही सकाळच्या व सायंकाळच्या सूर्याला चांगले निरीक्षण करून बघितलेले दिसते.’ ‘बरं, तुम्हाला प्रकाशाचे अपवर्तन कसे होते हे माहीत आहे काय?’ मावशीने विचारले. ‘नाही मावशी.’ दोघीही म्हणाल्या.

‘प्रकाश एका माध्यमातून दुस­ऱ्या माध्यमात किंवा पदार्थात जाताना तो थोडासा वाकून त्याची दिशा किंचितशी बदलते. प्रकाशाच्या होणा­ऱ्या या दिशाबदलास प्रकाशाचे अपवर्तन किंवा वक्रीभवन म्हणतात. तसेच प्रकाशकिरण एखाद्या पदार्थावरून किंवा माध्यमावरून मागे परत फिरतात त्याला परावर्तन म्हणतात. पण कोणत्या पदार्थामुळे प्रकाशाचे वक्रीभवन अथवा परावर्तन किती होते हे त्या पदार्थाच्या मूलभूत गुणधर्मावर म्हणजेच त्याच्या रासायनिक रचनेवर अवलंबून असते. तांबड्या रंगाची तरंगलांबी ही सर्वात जास्त असल्याने ते सर्वात कमी दिशा बदलतात, तर निळ्या-जांभळ्या रंगांच्या प्रकाशाची तरंगलांबी कमी असल्यामुळे ते सर्वात जास्त दिशा बदलतात.’ मावशीने सांगितले. ‘पण सूर्य उगवताना व मावळताना मोठा का दिसतो हे सांग ना मावशी.’ सीताने म्हटले.

‘तेच सांगते.’ मावशी सांगू लागली, ‘नीता, सीता त्याचं असं आहे मुलींनो, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सूर्य हा क्षितिजावर असताना सूर्यप्रकाशाचा मार्ग हा जास्त लांबीचा व तिरपा असतो. पृथ्वीभोवतालचे वातावरण हे अनेक थरांनी बनलेले असते. हे हवेचे थर वरच्या भागात विरळ असतात; परंतु जमिनीजवळ धूर, धूलिकणांमुळे ते खूप दाट असतात. सकाळ-संध्याकाळी या तिरप्या सूर्यकिरणांना वातावरणातील अनेक जास्तीच्या वेगवेगळ्या थरांतून यावे लागते. त्यामुळे एका माध्यमातून दुस­ऱ्या अफाट नि घनदाट धूलिकणांच्या दाट माध्यमात येताना त्यांचे वक्रीभवन झाल्यामुळे प्रकाशकिरणांचे थोडेसे प्रसरण होते व या वेळी सूर्यगोल आपणास इतर वेळेपेक्षा थोडासा मोठा भासतो.

वास्तविक सूर्यगोलाच्या आकारात काहीच फरक पडत नाही, तो जेवढा आहे तेवढाच असतो.’ त्यांच्या अशा गप्पा सुरू असतानाच मांजर आडवी गेली. म्हणजे स्वयंपाकघरात मांजरीचा आवाज आला नि मावशी पटकन उठून तिकडे गेली व त्यांच्या ज्ञानार्जनाच्या गप्पा थांबल्या.

Comments
Add Comment