Sunday, January 4, 2026

विनूचे आजोबा

विनूचे आजोबा

कथा : रमेश तांबे

विनूचे आजोबा रोज मोठमोठे ग्रंथ वाचत बसलेले असायचे. विनू ते रोज पाहायचा. पण त्याला हे कळायचं नाही की आजोबा या वयात ही एवढी मोठमोठी पुस्तकं का वाचतात! त्याचा काय फायदा? एक दिवस आजोबा आपल्या खोलीमध्ये ग्रंथ वाचत असतानाच विनू तिथे गेला आणि म्हणाला, “आजोबा मला एक सांगा; तुम्ही एवढे मोठमोठे ग्रंथ का वाचता? त्यातलं तुम्हाला किती कळतं आणि त्यातलं तुमच्या किती लक्षात राहतं?” आजोबा हलकेसे हसले आणि म्हणाले, “अरे विनू, माझं एक काम कर ना. त्या कोपऱ्यात एक टोपली आहे. कोळशाने भरलेली आहे ती. तू ती रिकामी कर आणि नदीवर जाऊन त्यात पाणी घेऊन ये.” मग विनू त्या कोपऱ्यात गेला. त्याने ती कोळशाने भरलेली आणि आतून बाहेरून काळीकुट्ट असलेली ती टोपली रिकामी केली अन् धावतच नदीवर गेला. घराच्या जवळच नदी वाहत होती. विनूने टोपली पाण्यात बुडवली पण सगळे पाणी गळून गेले. कारण ती टोपली कामट्यांनी, बांबूच्या पातळ पट्ट्यांनी बनवलेली होती. त्यात पाणी राहाणे शक्यच नव्हते. तरीही विनूने दोन-चार वेळा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. पण त्यात पाणी काही थांबेना.

मग तो पुन्हा आजोबांकडे आला आणि म्हणाला, “आजोबा त्या बांबूच्या टोपलीमध्ये पाणी काही राहत नाही. मी काय करू” आजोबा म्हणाले, “पुन्हा प्रयत्न कर, धावत ये, बघ नक्कीच जमेल तुला!” विनू परत मोठ्या उत्साहाने नदीवर गेला आणि आपल्या हातातली टोपली पाण्यात बुडवली. पण सर्व पाणी गळून गेले. त्याने पुन्हा एकदा टोपली पाण्यात बुडवली आणि धावत सुटला. पण अर्ध्या वाटेपर्यंत सर्व पाणी गळून गेले. विनूने परत परत प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी अपयशी ठरला. पाचव्या प्रयत्नात अगदी दरवाजात जाईपर्यंत थोडेसेच पाणी शिल्लक राहिले.

आता मात्र विनू कंटाळला. विनूने हातातली टोपली फेकून दिली आणि आजोबांना म्हणाला, “आजोबा, मी नाही आणणार पाणी. तुम्हाला हवे तर त्या प्लास्टिकच्या बादलीतून आणून देतो. पण या टोपलीतून आणणार नाही.” विनूच्या चेहऱ्यावर त्रासलेले भाव दिसत होते. आजोबांनी पुन्हा एकदा चेहऱ्यावरती हास्य आणले आणि म्हणाले, “अरे विनू बाळा, मला पाणी नकोय. पण तू एक काम कर. ती टोपली घेऊन इकडे ये आणि बस इथे माझ्या समोर.”

मग विनूने टोपली घेतली आणि आजोबांच्या समोर बसला. आता एका बाजूला आजोबा, दुसऱ्या बाजूला विनू आणि मध्ये टोपली. मग आजोबा बोलू लागले, “अरे बाळ विनू, मघाशी तू टोपली घेऊन गेलास तेव्हा या टोपलीचा रंग कसा होता रे!” विनू म्हणाला, “त्यात काय.. आतून बाहेरून काळीकुट्ट होती आणि आता कशी झाली आहे रे, आतून बाहेरून स्वच्छ!” आता आजोबा सांगू लागले, “अरे विनू, चांगल्या पुस्तकांचं, दर्जेदार ग्रंथांचं वाचन केल्याने आपणदेखील असेच आतून बाहेरून स्वच्छ होत असतो बरं! त्या ग्रंथातलं तुला कळो अथवा ना कळो. लक्षात राहो अथवा ना राहो. पण चांगल्या ग्रंथांच्या नियमित वाचनामुळे आपल्यातही असाच नकळत बदल होत असतो. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय तुला बरे!” वाचन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते आपल्याला नकळतपणे शुचिर्भुत, स्वच्छ निर्मळ आणि संवेदनशील बनवत असतं आणि म्हणून आपण वाचायचं असतं समजलं. टोपलीमधून पाणी आणण्याचा आजोबांचा उद्देश आता कुठे विनूला समजला. आता विनूचे डोळे चमकले आणि त्याची नजर बंद कपाटातल्या पुस्तकांकडे गेली.

तर मित्रांनो नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच आपणही ठरवूया की रोज नित्यनेमाने वाचन करायचे. जसे आपण रोजच्या रोज जेवण करतो अगदी तसेच, ठरलेल्या वेळेत.... अन् तेही भरपूर!

Comments
Add Comment