नवी दिल्ली : अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेतल्यामुळे उत्तर कोरियाचे किम जोंग-उन यांनी मादुरो हे आपले ‘मित्र’ असल्याचे सांगत अमेरिकेला उघडपणे महायुद्धाचा इशारा दिला आहे.
किम जोंग-उन यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन नेतृत्वाकडे मागणी केली आहे की, त्यांनी तातडीने निकोलस मादुरो यांची सद्यस्थिती जाहीर करावी. ते म्हणाले की, अमेरिकेचे हे पाऊल जागतिक संघर्षाला जन्म देऊ शकते. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना तातडीने सोडा अन्यथा याचे गंभीर आंतरराष्ट्रीय परिणाम होतील.
रशियानेही अमेरिकेच्या या कारवाईचा कडक शब्दांत निषेध केला आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करून म्हटलं आहे की, अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या विरोधात ‘सशस्त्र आक्रमकता’ दाखवली आहे, जी अत्यंत चिंताजनक आणि निंदनीय आहे. अमेरिकेने दिलेले तर्क निराधार असून हे पाऊल मुत्सद्देगिरीऐवजी वैचारिक शत्रुत्वाने प्रेरित आहे. मॉस्कोने सर्व बाजूंना तणाव वाढवणे टाळण्याचे आणि चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.