लातूर : लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थिनीचा मृतदेह मुलींच्या वसतिगृहातील खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अत्यंत हुशार आणि अभ्यासू म्हणून ओळख असलेल्या या विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांसह शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मृत विद्यार्थिनी औसा तालुक्यातील टाका गावची रहिवासी असून तिचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. प्राथमिक माहितीनुसार, अभ्यासाचा ताण आणि शालेय दबावामुळेच विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी या प्रकरणाला संशयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात, याचा तपास करण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी चौकशी करत असून वसतिगृहातील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत विद्यार्थिनीचे आजी-आजोबा, आई-वडील यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.
या घटनेनंतर जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने पालक जमा झाले. काही पालकांनी विद्यार्थ्यांवर शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे आरोप करत तक्रारी दाखल केल्या आहेत. अशा वातावरणामुळे विद्यार्थी मानसिक तणावात राहत असल्याचा दावा पालकांकडून करण्यात आला आहे. संभाव्य तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विद्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
या घटनेमुळे नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस तपासातून नेमके सत्य काय ते लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.