मुंबई : उद्धव आणि राज यांनी संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला. पण आजच्या दिवशी उबाठाला मोठा धक्का बसला. मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला. शुभा राऊळ कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अद्याप समजलेले नाही. पण त्या महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.
माजी महापौर शुभा राऊळ यांनी उबाठाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंकडे शुभा राऊळ यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. राजीनामा दिल्यानंतर शुभा राऊळ यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. भाजप नेते प्रविण दरेकरांच्या निवासस्थानी राऊळ आणि शेलार यांच्यात चर्चा झाली.

कोण आहेत शुभा राऊळ ?
शुभा राऊळ या २००७ ते २००९ या कालावधीत मुंबईच्या महापौर होत्या. त्या उबाठाच्या महिला नेत्या पण होत्या. दहिसरमधून अनेक टर्म नगरसेविका झालेल्या शुभा राऊळ यांनी महापौर असताना हुक्का पार्लर बंदीचा निर्णय घेतला. उबाठातील विनोद घोसाळकरांच्या राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या शुभा राऊळ यांनी २०१४ मध्ये मनसेत प्रवेश केला होता. पण अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी घरवापसी केली होती. एकनाथ शिंदे यांनी वेगळा विचार केल्यानंतरही शुभा राऊळ उद्धव ठाकरेंसोबतच होत्या. पण मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
उबाठा सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना भाजपने मुंबईच्या वॉर्ड क्रमांक दोनमधून उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर काही दिवसांनी शुभा राऊळ यांनी उबाठा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.