मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक २०२मध्ये उबाठाच्यावतीने माजी महापौर श्रध्दा जाधव यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यामुळे शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु ज्या चंद्रभागा शिंदे श्रध्दा जाधव यांनी फायर आजीची ओळख मिळवून दिली होती,त्या आता जाधव यांच्याऐवजी इंदुलकर यांच्यासोबत आहे. फायर आजीची 'श्रध्दा' आता आटली गेल्यामुळे या प्रभागात 'विजय' कुणाचा होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महापालिकेच्या एफ दक्षिण प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील शिवडीतील प्रभाग क्रमांक २०२ हा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गाकरता आरक्षित झाल्यानंतर याठिकाणी विद्यमान नगरसेविका श्रध्दा जाधव यांची प्रथम दावेदारी होती. तर हा प्रभाग खुला झाल्याने या शाखेचे शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांनीही आपला दावा ठोकला, तर युवा सेनेचे नेते आणि श्रध्दा जाधव यांचे पुत्र पवन जाधव यांनीही या प्रभागासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. परंतु तिकीट वाटपाच्यावेळी जाधव कुटुंबांमध्ये एकच उमेदवारी देण्याची वेळ आल्यानंतर पवन जाधव हे बाजुला झाले आणि श्रध्दा जाधव या प्रमुख दावेदार म्हणून उभ्या राहिल्या. तर दुसरीकडे शाखाप्रमुख विजय इंदुलकर हेही शिवसैनिकांच्या बळावर उमेदवारी मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि नाही मिळाली तर बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार यावर ठाम होते. अखेर श्रध्दा जाधव यांच्या झोळीत उमेदवारी पडल्यानंतर इंदुलकर यांनी आपला अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत बंडखोरी केली.
विशेष म्हणजे इंदुलकर यांनी फायर आजी म्हणून ज्यांची ठाकरेंनी ओळख निर्माण केली होती, त्या चंद्रभागा शिंदे यांना पुढे केले. त्यामुळे फायर आजीने आपला किल्ला लढवून इंदुलकर यांनाच उमेदवारी मिळावी अशी आक्रमक भूमिका मांडतानाच श्रध्दा जाधव यांच्या उमेदवारीला विरोध केला. विशेष म्हणजे मातोश्रीवर हनुमान चालिसा पठन करण्याचा इशारा देणाऱ्या नवनीत राणा यांना शिवडीतील शिवसैनिक आजी असलेल्या चंद्रभागा शिंदे यांनी एप्रिल २०२२मध्ये मातोश्रीबाहेर जमा होत वरूण सरदेसाई, साईनाथ दुर्गे, पवन जाधव यांच्यासमवेत बसत माध्यमांशी बोलतांना पुष्पा स्टाईल झुकेगा नहीं साला अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली होती. आजीने दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर त्यांना फायर आजी असे नाव देण्यात आले. श्रध्दा जाधव यांच्या शाखेतील ८० वर्षीय आजीची ही प्रतिक्रिया माध्यमांनी दाखवून त्यांना उचलून धरल्यानंतर त्यांना मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या भेटीला नेण्यात आले होते. तसेच त्यानंतर तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या उध्दव ठाकरे यांनी शिवडीतील त्यांच्या घरीही भेट दिली होती. त्यामुळे फायर आजी अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. श्रध्दा जाधव यांच्यामुळे फायर आजीची ओळख निर्माण झाली असली तरी आता याच आजी श्रध्दा जाधव यांच्या विरोधात आणि उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बोलू लागल्या आहेत. त्यामुळे बंडखोर विजय इंदुलकर यांना फायर आजीचा पूर्ण पाठिंबा असल्याने जाधव यांनी आजवर विजयाचा षटकार ठोकला असला तरी यंदाचा विजयी रथ त्यांचा रोखला जाणार आहे. यंदा जाधव यांच्यासमोर विजयच प्रमुख अडसर असल्याने विजयाचे सप्तक खरोखरच जाधव पार करू शकतात का आणि त्यांना त्यापासून बंडखोर विजय इंदूलकर आणि भाजपाचे पार्थ बावकर हे रोखतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे.