पिंपरी चिंचवड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहरातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला. तसेच अंतर्गत सेटिंग करणाऱ्या नेत्यांचे कान टोचले आहेत.
सेटिंग करणाऱ्यांना इशारा
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्यातील कथित छुप्या युतीवरही त्यांनी निशाणा साधला आहे. एकाच प्रभागातून लढताना दोन भाजप आणि दोन राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्याच्या सेटिंगच्या चर्चेवर चव्हाण चांगलेच संतापले आहेत. या विधानामुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि छुप्या युतीला चाप बसणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अजिबात शायनिंग मारायची नाही, सेटिंगही करायची नाही, रविंद्र चव्हाण यांची तंबी
भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असलेल्या नाना काटे यांच्याविरोधात निवडणूक लढवणे टाळले. नाना काटे हे पिंपळे सौदागरच्या प्रभाग क्रमांक २८ मधून निवडणूक लढवित आहेत. मात्र त्यांच्यासमोर निवडणूक लढवणे शत्रुघ्न काटे यांनी मुद्दाम टाळल्याची चर्चा आहे. त्याचवेळी पॅनेलच्या बाहेर जाऊन कुणीही स्वतंत्रपणे प्रचार करण्याचा प्रयत्न करू नये. अजिबात शायनिंग मारायची नाही. सेटिंगही करायची नाही. पॅनेलच्या उमेदवारच निवडून आणायचे, अशी तंबी रविंद्र चव्हाण यांनी दिली. त्यांचा रोख शत्रुघ्न काटे यांच्याकडे होता, अशी चर्चा सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात आहे.