भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेने छुपी युती करून हिंदुत्व नया नगरला विकले आहे असा आरोप भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला असून, शिवसेनेला मत म्हणजे काँग्रेसला मत देणे आहे. त्यामुळे अशा युतीला मतदारानी त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन केले.
भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने अनेक ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तसेच शिवसेनेने सुद्धा काही ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. जिथे शिवसेनेचे प्रभुत्व आहे त्या जागेवरील उमेदवारी अर्ज काँग्रेसने मागे घेतले आहेत. तसेच ज्या ठिकाणी काँग्रेसचे प्रभुत्व आहे अशा भागातून शिवसेनेने आपल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास लावले असल्याचे चित्र पाहता शिवसेना आणि काँग्रेसमध्ये छुपी युती झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
९५ जागांसाठी ४३५ उमेदवार रिंगणात
मीरा-भाईंदर महापालिकेच्या ९५ जागांसाठी ५४८ नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. त्यातील ११३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात ४३५ उमेदवार राहिले आहेत. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी २५०० अर्जांची विक्री झाली होती. त्यापैकी फक्त ६०० फॉर्म दाखल झाले. त्यातील काही अर्ज बाद झाल्यामुळे ५४८ अधिकृत उमेदवारांची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली होती; परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ११३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि रिंगणात ४३५ उमेदवार राहिले आहेत. यात सर्वाधिक भाजपचे ८६, शिवसेनेचे ८१, उबाठाचे ५६, काँग्रेसचे २६, राष्ट्रवादी काँग्रेस ३३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १४ आणि मनसे ११ अशा प्रमुख पक्षांच्या ३०७ आणि १२८ अपक्षांचा समावेश आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या काही जणांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजप आमदार नरेंद्र मेहता तसेच शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी त्यांची समजूत काढल्यावर अर्ज मागे घेण्यात आले.