Sunday, January 4, 2026

सारथी

सारथी

गोष्ट लहान, अर्थ महान : शिल्पा अष्टमकर

माणूस शिकतो, पुढे जातो; पण खऱ्या अर्थाने घडतो तो संवेदनशीलतेमुळे. संवेदनशीलता म्हणजे इतरांच्या भावना समजून घेण्याची, त्यांचा आदर करण्याची आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात देण्याची क्षमता. अशा संवेदनशील दृष्टिकोनातून जो व्यक्ती इतरांना योग्य दिशा दाखवतो, तो खऱ्या अर्थाने सारथी ठरतो. संवेदनशीलता म्हणजे केवळ दया दाखवणे नाही, तर दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवणे, आनंदात सहभागी होणे. चूक लक्षात आणून देताना कठोर न होता समजूतदारपणा दाखवणे.

दुर्बलांना आधार देणेही गुणवैशिष्ट्ये माणसाला माणूस बनवतात. सारथी म्हणजे मार्ग दाखवणारा, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करणारी व्यक्ती. तो शिक्षक, पालक, मित्र, वरिष्ठ किंवा समाजातील जबाबदार नागरिक असू शकतो. तो संवेदनशील सारथी असतो.

ऐकून घेतो. न्याय देताना भावना समजून घेतो. केवळ चुका दाखवत नाही, तर सुधारण्याचा मार्गही दाखवतो. शाळेत शिक्षक हा विद्यार्थ्यांचा सारथी असतो. एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे असेल, तर त्याला आळशी म्हणण्याऐवजी त्याची अडचण समजून घेणं ही संवेदनशीलता आहे. अशा शिक्षकामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवू लागतो. समाजातील संवेदनशील सारथी-समाजातही संवेदनशील व्यक्ती अनेकांचे जीवन बदलू शकते. अपयशी झालेल्याला धीर देणं, चुकीच्या मार्गावर असलेल्याला योग्य दिशा दाखवणं, दुर्लक्षित घटकांसाठी आवाज उठवणं, हीच संवेदनशील सारथीची खरी ओळख आहे.

संवेदनशीलता कशी विकसित करावी? इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे, स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून विचार करणे, मतभेद असले तरी आदर राखणे, मदतीसाठी तत्पर राहणे, कठोर शब्दांऐवजी सौम्य संवाद वापरणे, संवेदनशीलता हा असा गुण आहे जो माणसाला केवळ यशस्वी नाही, तर अर्थपूर्ण बनवतो. संवेदनशीलतेचा सारथी जीवनप्रवासात इतरांना दिशा देतो, अडचणीत आधार बनतो आणि समाजाला माणुसकीची शिकवण देतो. अशा सारथींची आजच्या समाजाला नितांत गरज आहे.

एकदा एक छोटा मुलगा आपल्या वडिलांबरोबर बाजारात निघाला होता. त्याचे वडील फार मोठे विद्वान गृहस्थ होते. त्यांनी चालता-चालता आपल्या मुलाला प्रश्न विचारला, “बाळा, तुला कोण व्हावंसं वाटतं?” तो मुलगा या प्रश्नावर थोडा वेळ गप्प झाला. थोड्या वेळाने परत तोच प्रश्न वडिलांनी त्याला विचारला. इतक्यात त्यांच्या समोरून एक रथ निघून गेला आणि त्या मुलाने पटकन उत्तर दिले, “बाबा, मला त्या रथातील सारथ्यासारखे ‘सारथी’ व्हावंसं वाटतं.” त्याचे उत्तर ऐकून वडिलांना फार वाईट वाटले. ते संपूर्ण बाजार फिरेपर्यंत त्याच्याशी एक शब्द सुद्धा बोलले नाहीत. बाजारातून घरी आल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला रागावून म्हटले, “सांभाळ तुमच्या चिरंजीवांना. त्यांना म्हणे सारथी व्हावंसं वाटतं!” आईने त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. थोड्या वेळाने ते बाहेर गेल्यावर आईने मुलाला कृष्ण-अर्जुन रथात बसलेले चित्र दाखवले आणि म्हणाली, “बाळा, तुला सारथी व्हावंसं वाटतं ना? मग जरूर हो पण या कृष्णासारखं. जो जगाचा रथ किती नीटपणे हाताळतो आहे आणि अर्जुनाला मार्गदर्शन करतो आहे.” त्या मुलाने त्यातला मथितार्थ समजून घेतला.

हाच मुलगा पुढे एक मोठा विद्वान म्हणून नावालौकिकास आला. ज्याने ‘शिकागो’ येथील धर्मपरिषदेत सर्व जगातील विद्वानांना आपल्या विचारांनी थक्क करून सोडले. ज्यांच्या विचाराने कितीतरी जणांनी हिंदूधर्म स्वीकारला शिवाय त्यांचा शिष्यवर्ग प्रचंड वाढला. त्या छोट्या मुलाचे नाव होतं ‘नरेंद्र’ आणि मोठेपणीचं नाव तुम्ही जाणलंच असेल, नाही का?-अर्थात ‘स्वामी विवेकानंद’.

तात्पर्य : ज्याची बुद्धी चौकस असते तो प्रत्येक गोष्टीकडे चौकस दृष्टिकोनातून पाहत असतो. विचार : जिज्ञासा ही सर्व शोधांची जननी आहे.

Comments
Add Comment