Sunday, January 4, 2026

करकरीत वर्ष

करकरीत वर्ष

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

नावीन्याचे आकर्षण नाही, असा माणूस जगात सापडणे शक्यच नाही, असे मला वाटते. माझी मैत्रीण एकदा तक्रार करत होती की तिचा मुलगा आता तीस वर्षांचा झाला आहे तरीसुद्धा नवीन शर्ट आणले की अगदी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत तोच शर्ट घालून बसतो. ही गोष्ट अजिबात हसण्यावारी नेण्याची नाहीच आहे. कपड्यांच्या बाबतीत हे जितकं खरं आहे तितकंच घरातील इतर वस्तूंच्या बाबतीतही! घरामध्ये नवीन कपबशींचा सेट आणला की सगळ्यांना त्या नवीन कपातूनच चहा हवा असतो. मग हे फक्त मोठ्यांच्या बाबतीतच घडते का, तर अजिबात नाही. अगदी लहान बाळ जे सहा-सात महिन्यांचे आहे, ते जर एका विशिष्ट खेळण्याने खेळत असेल आणि त्याच्यासमोर आपण दुसरे खेळणे धरले जे ते पहिल्यांदाच पाहत आहे, तर स्वाभाविकपणे त्याचे संपूर्ण लक्ष नवीन खेळण्याकडे केंद्रित होते. नवीन वस्तू हातात आल्याचा आनंद वेगळाच असतो, नाही का?

तर आता समोर एक संपूर्ण नवीन वर्ष आपल्यापैकी प्रत्येकालाच मिळालेले आहे, तर या नवीन वर्षाचे स्वागत आपण केलेलेच आहे; परंतु हे संपूर्ण नव्हे करकरीत वर्ष जे आपल्याला मिळाले आहे त्याचे आपण नेमके काय करणार आहोत याचा आपण विचार करून ठेवलाय का? नसेल केला तर काहीच हरकत नाही. आज ४ तारीख आहे. आपल्या हातात भरपूर वेळ आहे. दोन-चार दिवसांत तरी आपण ठरवं शकू की नेमकं काय करायचं आहे.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरातील जुने सामान कमी करायचे. जुने टेप रेकॉर्डर, रेकॉर्ड्स, कॉम्प्युटर कीबोर्ड, घरात फर्निचर झाल्यावर उरलेले सनमायकाचे किंवा लाकडाचे तुकडे, घराची रंगरंगोटी झाल्यावर उरलेले प्रायमर वा रंग, जुने पडदे, अनेक वर्षांपूर्वी विकत घेतलेले आणि कधीच न वापरलेले किंवा खूप वापरलेले कपडे.... खरंतर ही यादी न संपणारी आहे.

एका खोलीतील, एका कपाटातील, एका कप्प्यातील सामानापासून सुरुवात करा. प्रत्येक वस्तूशी कितीतरी आठवणी निगडित असतात. जवळच्या नातेवाइकांनी दिलेल्या वस्तू, जवळच्या मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या वस्तू, जे सगेसोयरे आपल्या आयुष्यातून निघून गेलेत त्यांनी दिलेल्या वस्तू, प्रवासादरम्यान विकत घेतलेल्या महागड्या वस्तू... फक्त विचार करून पाहा की यातील कोणती वस्तू शेवटी केव्हा वापरली? बरं आठवत नसेल तर फक्त विचार करा की यापुढेही वस्तू आपण नेमकी केव्हा वापरणार आहोत? जर उत्तर देता आले नाही तर सरळ ती वस्तू कोणाला उपयोगी असेल आणि तो व्यक्ती ती घेऊ शकत असेल त्यांना ती द्या. तेही शक्य नसेल तर रद्दीवाल्याला द्या. रद्दीवालाही घेत नसेल तर सरळ त्याला कचऱ्याची टोपली दाखवा. बघा पंधरा-वीस मिनिटांमध्ये एका खोलीतील, एका कपाटातील, एक कप्पा किती रिकामा झाला. हळूहळू जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हेच काम चालू ठेवा. कपाटे, घरातील माळा, छोट्या-मोठ्या गॅलऱ्या यांना थोडासा मोकळा श्वास घेऊ द्या. नवीन वस्तूंसाठी तिथे मोकळी जागा करा.

हे काम करून झाल्यावर मोबाईल घेऊन त्यातील नको असलेले फोटो, डुप्लिकेट फोटो, स्क्रीन शॉट, नको असलेल्या फाइल्स उडवून टाका. व्हाॅट्सअॅप उघडून कामानिमित्त तयार झालेले छोटे-मोठे ग्रुप उडवून टाका. मेल उघडा. तिथून नको असलेले मेल्स उडवून टाका. ज्याचा उपयोग झालेला आहे आणि ज्याचा कधीही उपयोग होणार नाही, असे सगळे उडवून टाका. सरळ शब्दांत सांगायचे म्हणजे घरातल्या कोणत्याही कामासाठी आपल्याला मोलकरीण मिळू शकते; परंतु आपला मोबाईल आपल्यालाच, मनाचा झाडू हातात घेऊन साफ करावा लागतो. त्यासाठी कोणतीही मोलकरीण मिळू शकत नाही.

अशा तऱ्हेने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण एकदा तयार झालात की मग अतिमहत्त्वाचे हे आहे की, आतापर्यंत आपण जे करत आलो आहोत त्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची गरज आहे. म्हणजे मनात अनेक वर्षे दाबून ठेवलेली एखादा नृत्य प्रकार शिकण्याची इच्छा, संगीत क्षेत्रातील एखादे वाद्य शिकण्याची इच्छा, एखाद्या कलेसाठी वेळ देण्याची इच्छा असेल, तर हीच वेळ आहे आणि हेच वर्ष आहे त्यासाठी वेळ देऊ या.

काहीही नवीन शिकताना आपोआपच जुन्या वाईट गोष्टी विस्मृतीत जाऊ लागतील आणि मन या नवीन कलेने भरून जायला सुरुवात होईल. चला, सुरुवात तर करू या. माहीत नाही कोणत्या वळणावर कोणती गोष्ट आपल्याला कुठे घेऊन जाईल. नवनिर्मितीचा आनंद कदाचित आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पैसा, प्रसिद्धी मिळवून देईल...!

केशवसुतांची ‘तुतारी’ आठवा - जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका! चला तर कामाला लागा! नववर्षाचा आनंद स्वतःच मिळवा!

pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment