Friday, January 2, 2026

Virar Rename as Dwarkadhish: विरारच होणार नामांतर?? सोशल मीडियावर समर्थन आणि संतापाची लाट

Virar Rename as Dwarkadhish: विरारच होणार नामांतर?? सोशल मीडियावर समर्थन आणि संतापाची लाट

पालघर : मागील काही वर्षांपासून राज्यात शहरांची व जिल्ह्यांची नावे बदलण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. तसाच मुंबईत अनेक स्थानकांची ही नावे बदलण्यात आली आहेत. अशातच आता विरार शहराच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला असून, विरारचे नाव बदलण्याचा प्रस्ताव चर्चेत आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या संभाव्य नामांतराच्या चर्चेमुळे शहरात तसेच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

विरार परिसरात ठिकठिकाणी ‘जय द्वारकाधीश’ असा मजकूर असलेले पिवळ्या आणि निळ्या रंगाचे फ्लेक्स झळकू लागले असून, या नामांतराच्या मागणीने अधिकच लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावरही हा विषय वेगाने व्हायरल होत असून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर विविध पोस्ट्स, व्हिडिओ क्लिप्स आणि प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही व्हिडिओंमध्ये थेट विरारचे नाव बदलून ‘द्वारकाधीश’ करण्याची मागणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, या कथित नामांतराच्या चर्चेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि विशेषतः मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. विरार हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक ओळख असलेले नाव असून, ते बदलण्यामागे नेमका उद्देश काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर विरारमध्ये नुकतीच उभारण्यात आलेली गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराची भव्य प्रतिकृती चर्चेत आली आहे. मागील महिन्यात या मंदिराचे उद्घाटन झाले असून, हे मंदिर वसई-विरार परिसरातील एक नवे धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण करत आहे. विशेष म्हणजे, पारंपरिक स्थापत्यशैलीत उभारण्यात आलेले हे मंदिर सिमेंट किंवा आधुनिक साहित्याचा वापर न करता केवळ कोरलेल्या दगडांच्या साहाय्याने बांधण्यात आले आहे.

याच मंदिराच्या पार्श्वभूमीवर विरारचे नाव बदलण्याची मागणी पुढे येत असल्याची चर्चा आहे. मात्र, या मागणीला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असून, हा विषय येत्या काळात राजकीय आणि सामाजिक पातळीवर अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >