डोंबिवली : कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणूक रिंगणात आता ४९० उमेदवार आहेत. मनपाच्या १२२ जागांसाठी या उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. अर्ज केलेल्या २०५ जणांनी माघार घेतली. यामुळे निवडणूक रिंगणात ४९० उमेदवार उरले आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे १५ आणि शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
कडोंमपा अर्थात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने या निवडणुकीसाठी युती केल्याची घोषणा केली. भाजप ६५ जागांवर आणि शिवसेना ५७ जागांवर लढणार असे जाहीर करण्यात आले. दोन्ही पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी नियमांचे पान करत उमेदवारी अर्ज भरले. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल झाले. पण छाननी प्रक्रियेत काही अर्ज बाद झाले तर काही उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या १५ उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला.
प्रभाग क्रमांक १८ मधून रेखा चौधरी, प्रभाग क्रमांक २६ क मधून आसावरी नवरे आणि प्रभाग क्रमांक २६ ब मधून रंजना पेणकर यांच्या विरोधात दाखल झालेले सर्व उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले. तर उर्वरित बारा उमेदवारांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या अनेक उमेदवारांनी माघार घेतली. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बंडखोरांची समजूत काढली. बंड थंड झाले. यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अनेक उमेदवारांनी विकासाच्या मुद्यावर भाजपला पाठिंबा देत माघारीची घोषणा केली. माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे एकूण १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले.