ताक हे आरोग्यासाठी गुणकारी असून पूर्वीपासूनच आहारामध्ये ताकाचा समावेश केला जातो. ताक आणि दही हे दोन्हीही पदार्थ आरोग्यासाठी महत्वाचे मानले जातात. पचनाच्या दृष्टीने ताक किंवा दही खाणे फायदेशीर ठरते.
ताकाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते, शरीरात शीतलता निर्माण होते. ताकामध्ये व्हिटॅमिन डी आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते. ताक हे हाडांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी गुणकारी आहे. ताकामध्ये प्रोबायोटिक असल्यामुळे अन्न पचनास मदत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास ताक मदत करते.
ताक प्यायल्याने ताजेतवाने वाटते. खासकरून उन्हाळ्यात ताक पिण्याचे असंख्य फायदे आहेत. शरीराला थंडावा देण्यासोबतच ताक खूप सारे पौष्टिक घटक शरीराला पुरवते . ताकामध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि अँटी ऑक्सिडन्ट हे पौष्टिक घटक असतात. ते शरीरासाठी आवश्यक आहेत. यामुळेच दररोज दुपारी एक ग्लास ताक पिणे आरोग्यासाठी लाभाचे असल्याचे डॉक्टर सांगतात.