Thursday, March 26, 2026

उबाठाने मनसेला दिल्या पडेल जागा

उबाठाने मनसेला दिल्या पडेल जागा

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर प्रत्यक्षात युतीची घोषणा झाली. परंतु, दोन्ही भावांचे मन जुळवून आणत भावनिक बंध जोडण्याच्या प्रयत्नात मात्र मनसेचा गेम करण्यात आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. उबाठाने या युतीमध्ये स्वत:ला मोठा भाऊ मानत मनसेला छोटा भाऊ म्हणून ५२ जागा सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु मनसेला सोडलेल्या सर्व जागा पडेल असून त्याठिकाणी मनसेचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मनसेचे कमीत कमी उमेदवार निवडून येत त्यांच्या जोरावर आपले सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी उबाठाने रचलेल्या खेळीत राज ठाकरेंसह त्यांचे शिलेदार अडकले गेल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि उबाठामध्ये युती झाल्यानंतर प्रत्यक्षात उबाठाने १६५ जागा लढवण्याचा आणि मनसेला ५२ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जागा वाटप करत आपल्या पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्जांचे वाटप केले. त्याप्रमाणे दोन्ही पक्षांच्यावतीने आपापले उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केले. विशेष म्हणजे उबाठा हा मुंबईतील मोठा पक्ष होता. त्यामुळे मराठीबहुल वस्त्यांमध्ये मनसेला उमेदवार देणे अपेक्षित होते. त्यानुसार मनसेला माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मागाठणे, विक्रोळी आणि भांडुपमध्ये जास्त जागा सोडून उर्वरीत विधानसभांमध्ये उबाठाने सर्व जागा द्यावा किंवा मराठी वस्त्यांची एखादी जागा द्यावी अशाप्रकारची मागणी युतीच्या चर्चेदरम्यान होती. परंतु, युतीमधील जागा वाटपाची चर्चा करताना मनसेच्या नेत्यांना उबाठा पक्षप्रमुखांनी आणि त्यांच्या नेत्यांनी काही पडेल जागा देत महत्वाच्या जागा आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. याला मनसेच्या नेत्यांनी सहमती दर्शवली. परंतु मनसेच्या कुणाही उमेदवाराने याला विरोध दर्शवला नाही. कोणत्याही परिस्थितीत दोन्ही भाऊ एकत्र यावेत या भावनिक मुद्दयावर मनसेच्या नेत्यांनी विरोध केला नाही आणि यात राजकीय कुटील डाव रचत उबाठाने त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यामुळे उबाठाने ज्या जागांवर आपला उमेदवार निवडून येणार नाही,अशा जागा मनसेला सोडल्या. वरिष्ठ जाणकारांच्या म्हणण्यानुसार, मनसे आणि उबाठाच्या युतीचा फायदा मुंबईत मनसेला होणार होता, पण उबाठाला होण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे उबाठाने राजकीय डाव रचत आपल्या पडेल जागा त्यांना दिल्या आणि जरी निवडून आल्या तरी त्यांची संख्या जास्त होणार नाही याची काळजी घेतली आहे.

भांडुपमधील क्रमांक ११४ ही जागा मनसेला सोडण्याची मागणी करूनही ती जागा उबाठाने आपल्याकडे ठेवली. तर प्रभाग क्रमांक १७८ मध्ये उबाठाची ताकद असली तरी विद्यमान नगरसेवक अमेय घोले यांच्यासमोर आपला निभाव लागणार नाही. त्यामुळे ही उबाठाने मनसेला सोडली. तसेच वरळीतील प्रभाग क्रमांक १९६ आणि १९७ या दोन जागांची मागणी केलेली असतानाच शेवटच्या क्षणाला प्रभाग क्रमांक १९७ मनसेला सोडण्यात आला. तसेच प्रभाग क्रमांक ११८मधून मनसेला ढोलम यांना उमेदवारी द्यायची नव्हती, पण खासदार संजय राऊत आणि त्यांच्या भावाने ढोलम यांच्यासाठीच जागा सोडून त्यांना उमेदवारी मिळवून दिली. त्यामुळे उमेदवार आणि जागा मनसेची असताना राऊत बंधूंनी याठिकाणी आपल्या मर्जीतील उमेदवाराला मनसेतून उमेदवारी मिळवून दिल्याचेही बोलले जात आहे.

कोणत्या जागा आहेत पडेल, प्रभाग क्रमांक

०८, १०, ११, १८, २०, २१, २३, २७, ३६, ३८, ४६, ५५, ५८, ६८, ७४, ८४, ८५, ९८, १०३, १०४, १०६, ११०, ११९, १२८, १२९, १३३, १३९, १४३, १४६,१४९, १५०, १५२, १७५, १७८, १८८, २०९, २१२, २१४, २१६, २१७,२२३ आणि २२६.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >