मुंबई : मुंबईत राज ठाकरेंचा हात हातात आल्यावर हुरळून गेलेल्या उबाठाला आता प्रत्यक्ष प्रचारा आधीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दिंडोशी विधानसभेतील प्रभागामध्ये उबाठाच्या उमेदवारांच्या अर्जांवर शिवसेनेने आक्षेप नोंदवला आहे. निवडणूक प्रक्रियेतील नियमानुसार पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना देण्यात येणाऱ्या एबी फॉर्मवर स्व हस्ताक्षरातील स्वाक्षरी असणे आवश्यक असते. परंतु उबाठाच्या उमेदवारांना देण्यात आलेल्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेने या अर्जांवर आक्षेप नोंदवला आहे . या आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. असे मात्र या आक्षेपामुळे उबाठा उमेदवारांच्या गोटात एकच खळबळ माजलेली आहे.
उबाठा शिवसेनेच्या वतीने दिंडोशी विधानसभेतील प्रभाग क्रमांक ३८, ३९, ४०, ४१ आणि ४२ प्रभागाचे अर्ज मालाड पूर्वेतील उत्तर पूर्व विभाग निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी दाखल अर्जांची छाननी सुरू असताना शिवसेनेचे विभाग प्रमुख वैभव भरडकर यांनी यावर आक्षेप नोंदवला. उबाठा उमेदवारांना देण्यात आलेल्या अर्जावर डिजिटल स्वाक्षरी असल्याचे भरडकर यांनी हे आक्षेप नोंदवले आहेत.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, कोणत्याही पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांना देण्यात येणाऱ्या एबी फॉर्मवर स्व: हस्ताक्षरातील स्वाक्षरी असणे गरजेचे असते.. मात्र, उबाठा उमेदवारांच्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे ठाकरेंच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची मागणी वैभव भरडकर यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. या संपूर्ण मालाड आणि दिंडोशी भागासह उबाठाने डिजिटल स्वाक्षरी असलेले एबी फॉर्म दिल्याने त्यांचे अर्ज बाद करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली आहे. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात तक्रार स्वीकारून कारवाई करता येईल हे पडताळून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. निवडणूक आयोगाच्या कायद्याचे उल्लंघन झाल्याने हे अर्ज बाद करण्याची गरज असून आम्ही नियमानुसार करायची मागणी करत असल्याचे भरडकर यांनी स्पष्ट केले.