मोहित सोमण: केंद्र सरकारने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवर ४०% अतिरिक्त भार लावण्यास मान्यता दिल्याने आज सिगरेट उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान घसरण झाली आहे. सुरूवातीच्या कलात हे शेअर १०% पर्यंत कोसळले आहेत. सकाळच्या सत्रात गॉडफ्रे फिलिप्स (७.४७%), आयटीसी (८.८८%), वीएसटी इंडस्ट्रीज (२.१९%), एनटीसी इंडस्ट्रीज (२.४०%) यांसारख्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली आहे. १ फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू होतील असे केंद्राने स्पष्ट केल्याने आज गुंतवणूकदारांनी संबंधित शेअरला नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आयटीसी शेअर्समध्ये तर गेल्या ६ वर्षातील सर्वाधिक घसरण झाली असून दुपारी १.०४ वाजेपर्यंत ३६५.६० पातळीवर पोहोचला आहे जो २०२३ नंतर सर्वाधिक निचांकी पातळीवर शेअर कोसळला आहे. सुरुवातील आयटीसी ६.११% कोसळला असताना गॉडफ्रे फिलिप्स तर सुरवातीच्या कलात १०% कोसळला होता. दुपारी १.०४ वाजेपर्यंत वीएसटी शेअर २.३५% कोसळला असून २५१.५० रूपयांवर व्यवहार करत आहे. दरम्यान एनटीसी शेअर दुपारी १.०४ वाजेपर्यंत २.४०% कोसळत १५९ रूपयांवर व्यवहार करत होता.
सरकारने नव्या अधिनियमानुसार तंबाखू, गुटखा, खैनी, जर्दा, सिगरेट व तत्सम वस्तूवर सीन गूड (Sin Goods) म्हणून वर्गीकरण केल्याने या वस्तूवर ४०% अतिरिक्त भार सरकार लादणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या किंमतीपेक्षा अतिरिक्त ४०% कर लावल्याने कंपनीच्या महसूलात यांचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या शेअर्समध्ये घसरण झाली. यासह सरकारने संबंधित मशिनरी उत्पादनावर नव्या नियमानुसार अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेतल्याने यांचा मोठा परिणाम बाजारातील उत्पादन व त्यावरील मार्जिनवर अपेक्षित आहे. सरकारने सप्टेंबर महिन्यातील केलेली जीएसटी कपात जीवनावश्यक वस्तूवर करताना चैनीच्या वस्तूंवर मात्र अतिरिक्त भार लावण्याचा निर्णय घेतला दरम्यान बिडीवरील १८% पातळी कायम राखण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा अंमलबजावणी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये आज गुंतवणूकदारांना मोठ्या 'सेल ऑफ' चा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.