मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसेमध्ये युती झाल्यानंतर आपला गड असलेल्या माहिम विधानसभेत तीन जागांची मागणी मनसेने केली होती. परंतु प्रत्यक्षात जागा वाटपाता मनसेच्या वाट्याला एकमेव दादरमधील प्रभाग क्रमांक १९२ आला आहे. त्यामुळे मागणी तीन जागांची झाली असली तरी प्रत्यक्षा उबाठाने मनसेला केवळ एका जागेवर गुंडाळून आपल्या पदरात दोन जागा पाडून घेतल्या आहेत.
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसे आणि उबाठाची युती झाल्यानंतर माहिम विधानसभेतील प्रभाग क्रमांक १९०, प्रभाग क्रमांक १९२ आणि प्रभाग क्रमांक १९४ वर मनसेने दावा केला होता. अन्य विधानसभांमध्ये मनसेच्या वाट्याला एखादी जागा दिली गेली तरी चालेल पण माहिममध्ये तीन जागा दिल्या जाव्यात यासाठी मनसे आग्रही होती. परंतु तीन जागांची मागणी असतानाच प्रभाग क्रमांक १९० आणि प्रभाग क्रमांक १९४ मनसेला सोडण्यास उबाठा तयार झाले होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक १९२ हा आपल्याकडे कायम राखण्यात उबाठा यशस्वी ठरली होती. परंतु प्रभाग क्रमांक १९४मधून मनसेच्यावतीने यशवंत किल्लेदार यांना निवडणूक लढवण्यास कठिण जाईल आणि उबाठाचे उमेदवार असलेले निशिकांत शिंदे यांचा पत्ता कट होईल. या भीतीने मनसेने प्रभाग क्रमांक १९२ पुन्हा मागून धेतला आणि प्रभाग क्रमांक १९४ उबाठाला सोडण्याची तयारी दर्शवली. परंतु, शेवटच्या क्षणाला मनसेच्या वाट्याला तीन जागांपैंकी केवळ दोन जागा मिळणार होत्या, तिथे प्रभाग क्रमांक १९४ पाठोपाठ प्रभाग्र क्रमांक १९०ही गेला. त्यामुळे प्रभाग क्रमांक १९२ हा एकमेव राहिला आणि त्याठिकाणी मनसेच्यावतीने यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर होवून त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे.
त्यामुळे या विधानसभेत मनसेला तीन जागा दिल्या गेल्या असत्या तर तिन्ही जागांवर मनसेचे उमेदवार निवडून येणे शक्य झाले असते. तर या विधानसभेतील दोन प्रभाग हे मनसेच्या अधिक ताकदीवर उबाठाला निवडून आणणे शक्य झाले असते. त्यामुळे या विधानसभेत उबाठा आणि मनसे युतीचे पाचही उमेदवार निवडून येणे शक्य होते, परंतु उबाठाने महत्वाच्या जागा नाकारल्याने मनसेमध्ये प्रचंड नाराजी आहे.






