किरीट सोमय्यांचा दावा; मुंबईला मुस्लिम करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप
मुंबई: "मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे दुप्पट आहे. त्यामुळे २०५० मध्ये हिंदू ५४ टक्क्यांखाली आणि मुस्लीम लोकसंख्या ३० टक्क्यांवर जाईल", असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी केला. मुंबईला मुस्लिम करण्याचा डाव सुरू असून, मुंबईकर मतदार ते कदापी होऊ देणार नाही, असे सोमय्या म्हणाले.
मुंबईतील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमय्या म्हणाले, "मराठी मुंबई आता मुस्लीम मुंबई झाली आहे. हे किरीट सोमय्या किंवा अमित शाह नव्हे, तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट सांगत आहे. २०५० मध्ये हिंदू ५४ टक्क्यांखाली आणि मुस्लीम ३० टक्क्यांच्या वर जाईल. मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे दुप्पट आहे. उबाठाचा सहकारी एमआयएम पक्ष सांगतो, मुंबईचा महापौर खान, पठाण किंवा बुरखावाली असावी हे आमचे लक्ष्य आहे. ठाकरे बंधू यावर एक शब्द बोलत नाहीत. मुंबईत बांगलादेशींचे अतिक्रमण इतक्या मोठ्या संख्येने होत आहे, त्यावर चाकर शब्द काढत नाहीत. माफिया कंत्राटदारांकडून तुम्हाला पैसे मिळतात म्हणून 'मुस्लीम मुंबई' बनवण्याचं कटकारस्थान एमआयएम आणि ठाकरे बंधूकडून होत असेल. परंतु हे महायुती यशस्वी होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
"आता मोठ्या ठाकरेंसोबत छोटे ठाकरे एकत्र आले आहेत. मराठी मुंबई म्हणायचे आणि मुस्लीम मुंबई करण्याच्या कारस्थानात सहभागी व्हायचे! माझ्याकडे जनगणनेचे आकडे आहेत. १९४७ मध्ये जेव्हा देशाचे विभाजन झाले तेव्हा मुंबईत मुस्लिमांची संख्या ८.८ टक्के होती आणि आता हाच आकडा २०११ साली २०.६८ टक्के इतका वाढला आहे. २०२५ मध्ये मुंबईत मुस्लीम लोकसंख्या २४.९८ टक्के आहे. त्या जीवावर उबाठाने लोकसभेला व्होट जिहाद केले. धारावीत त्यांनी २५ हजार मुस्लिमांचे नेतृत्व करत अनधिकृत मशिदीसाठी पुढाकार घेतला", असा आरोप सोमय्या यांनी केला.
उबाठाने मुस्लिमांची शरणागती स्वीकारली
१९९२ साली बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या हिंदुत्ववादी नेतृत्वामुळे मुंबई वाचली. मात्र उबाठाने मुस्लिमांची शरणागती स्वीकारली आहे. उत्तर भारतीय असो, गुजराती, राजस्थानी असो, हिंदू हा हिंदू आहे. उबाठाला मुंबईत महापौर नकोय, तर महापालिकेतील माफिया कंत्राटदारावर त्यांचे नेतृत्व हवे आहे. भाजपचे लक्ष्य मुंबईचा विकास करायचा आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.