मुंबई : उबाठा आणि मनसेच्या युतीमध्ये झालेल्या जागा वाटपात उबाठाच्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली गेली आहे. उबाठाचे गड असलेले आणि एकाच व्यक्तीला उमेदवारी देण्यात येत असल्याने नाराज झालेल्या उबाठाच्या कार्यकर्त्यांमधून जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आपल्या पदांचे राजीनामे देण्यात आले आहे. परळ, वरळी, विक्रोळी आदी भागांमधील उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याचे वृत्त आहे.
वरळी विधानसभेतील प्रभाग क्रमांक १९३मध्ये हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने शाखाप्रमुख सुर्यकांत कोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. वरळीमधील प्रभाग क्रमांक १९६मधून माजी बेस्ट समिती अध्यक्ष व माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी जाहरी झाल्याने शाखाप्रमुखांसह इतरांनीही आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक १९७च्या उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदांचे राजीनामे पक्षाकडे पाठवल्याचे वृत्त आहे. आदित्य ठाकरे आमदार असलेल्या या वरळीमध्ये तीन प्रभागांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरल्याने त्यांना आपले राजीनामे द्यावे लागले. परंतु ही नाराजी आदित्य ठाकरे यांना थोपवता आलेली नाही. उबाठाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत आमदार असलेल्या विक्रोळी विधानसभेतही मनसेला जागा सोडल्याने तीव्र नाराजी पसरली आली आहे. विक्रोळी पश्चिम मधील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि गटप्रमुखांनी आपले राजीनामे दिल्याचे वृत्त आहे, प्रभाग क्रमांक २०२मधून पुन्हा एकदा माजी महापौर श्रध्दा जाधव यांना उमेदवारी देण्यात आल्याने विभागातील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ही नाराजी थेट मातोश्रीपर्यंत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने भेट देत कळवण्याचा प्रयत्न केला. शाखाप्रमुख इंदुलकर यांना उमेदवारी न दिल्यामुळे शिवसैनिकांमधील ही नाराजी होती. आम्ही काय झेंडे फडकावण्यासाठी आंदोलने करण्यासाठीच आहोत काय असा सवाल करत शिवसैनिकांनी आम्ही यांचा प्रचार करणार नसल्याचेही ठासून सांगितले. तसेच कुर्ला प्रभाग क्रमांक १६९मधून उबाठाने विद्यमान नगरसेविका प्रविणा मोरजकर यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक कमलाकर नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.