हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरवरून दोन स्वदेशी विकसित प्रलय क्षेपणास्त्रांचेलागोपाठ यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या चाचण्यांमुळे भारताच्या लढण्याच्या क्षमतेत मोठी भर पडली असून, देशाच्या संरक्षण सज्जतेला नवे बळ मिळाले आहे.
वापरकर्ता मूल्यांकन चाचण्यांच्या अंतर्गत ३१ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता ही चाचणी झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही क्षेपणास्त्रांनी ठरवून दिलेल्या मार्गाचे अचूक पालन केले आणि सर्व उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण केली. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीतील प्रगत ट्रॅकिंग सेन्सर्सद्वारे क्षेपणास्त्रांच्या कामगिरीची पुष्टी करण्यात आली, तर लक्ष्य क्षेत्राजवळ तैनात जहाजांवरील टेलिमेट्री प्रणालीद्वारे अंतिम टप्प्यातील घटनांची पडताळणी करण्यात आली.
प्रलय हे घन इंधनावर आधारित, लहान पल्ल्याचे अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून ते अत्याधुनिक मार्गदर्शन आणि नेव्हिगेशन प्रणालींनी सुसज्ज आहे. या क्षेपणास्त्राची अचूकता अधिक असून ते विविध प्रकारचे पारंपरिक वॉरहेड्स वाहून नेण्यास सक्षम आहे. वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता असल्याने हे क्षेपणास्त्र लष्करासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रलय क्षेपणास्त्र प्रामुख्याने शत्रूच्या तळांवर, कमांड सेंटर्स, रडार प्रणाली आणि इतर सामरिक ठिकाणांवर अचूक हल्ला करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
हे क्षेपणास्त्र हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमरतच्या नेतृत्वाखाली डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योग भागीदारांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी प्रणाली विकास आणि उत्पादन भागीदार म्हणू न महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या चाचण्यांना वरिष्ठ डीआरडीओ शास्त्रज्ञ, भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल डीआरडीओ, सशस्त्र दल, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि उद्योग भागीदारांचे अभिनंदन केले. प्रलय क्षेपणास्त्र प्रणालीची विश्वासार्हता आणि कार्यक्षमता या चाचण्यांमधून सिद्ध झाली असून, आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. या यशस्वी चाचणीमुळे भारताची स्वदेशी क्षेपणास्त्र क्षमता अधिक मजबूत झाली असून, भविष्यातील सामरिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देश अधिक सक्षम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.






