डोंबिवली : महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवार ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी संपली आहे. आता अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू होण्याआधीच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने खातं उघडून दमदार सुरुवात केली आहे. आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे अर्थात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक २६ (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तर रेखा चौधरी यांनी पॅनल क्रमांक १८ (अ) मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांचीही निवड बिनविरोध झाली आहे. अर्ज छाननीची प्रक्रिया झाल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी आसावरी केदार नवरे आणि रेखा चौधरी या भाजपच्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा होईल.
कल्याण-डोंबिवलीत यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. मात्र समीकरणे बदलली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
महायुती म्हणून शिवसेना ६६ आणि भाजप ५६ जागांवर लढत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस ४२ जागांवर स्वबळावर लढत आहे. मनसे आणि उबाठाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे ५४ तर उबाठा ६८ जागांवर निवडणूक लढवत आहे. जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी सर्वच पक्षांसमोर कमी जास्त प्रमाणात बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान आहे.