पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील किल्ले, टेकड्या आणि संरक्षित वनक्षेत्रात वन विभागाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जंगल आणि डोंगर भागात मद्यपान, गोंगाट आणि गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी बुधवारी सकाळपासूनच गस्त वाढवण्यात आलीअसल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. रात्रीच्या वेळेतही अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
सिंहगड, राजगड-तोरणा, लोहगड, विसापूर, राजमाची अशा लोकप्रिय किल्ल्यांवर ३१ डिसेंबर रोजी मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरातील हॉटेल्स आणि रिसॉर्टमधील गर्दी टाळून अनेक जण नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला निर्जन भागात, जंगलाच्या पायथ्याशी किंवा डोंगरदऱ्यांमध्ये तंबू टाकून रात्रभर पार्टी करण्याचा प्रयत्न करतात. काही पर्यटन कंपन्यांनी ‘निसर्गाच्या कुशीत नवीन वर्ष’ ही संकल्पना पुढे रेटल्याने मुळशी, ताम्हिणी, लोणावळा, खंडाळा, भोर-राजगड परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
या भागांतील संरक्षित वनक्षेत्रालगत असलेल्या फार्महाऊस आणि मोकळ्या जागांवर काही ठिकाणी गेट-टुगेदर, बार्बेक्यू पार्टींचे आयोजन केले जाते. मात्र या गोंगाटाचा जंगलातील वन्यप्राण्यांच्या हालचालींवर विपरीत परिणाम होत असून, मद्याच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा जंगलात टाकणे यामुळे प्रदूषण वाढते तसेच माळरानावर वणवा लागण्याचे प्रकार घडतात. यामुळेच वन विभागाने मागील दोन वर्षांपासून ३१ डिसेंबरला विशेष दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग असणार आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. गडावर मांसाहार आणि मद्यपानास सक्त मनाई असतानाही काही जण दारू चोरून नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी असलेल्या टोलनाक्यावर प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर गडावर जाणारी वाहने रोखली जातील, तर फिरायला गेलेल्या पर्यटकांनाही खाली पाठवण्यात येईल. सायंकाळी सहानंतर सिंहगड पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.