जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गट यांच्यात कायदेशीर संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल ३५ उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, भाजपने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जोरदार आक्षेप नोंदवला आहे.
भाजपचा दावा आहे की ठाकरे गटाच्या ३५ उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या एबी फॉर्मवर मूळ सही नसून स्कॅन केलेली सही वापरण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एबी फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत स्वाक्षरी कर्त्याची मूळ सही आवश्यक असून, स्कॅन किंवा फोटोकॉपी केलेली सही वैध धरली जात नाही.
भाजपचे उमेदवार अरविंद देशमुख यांच्यासह इतर उमेदवारांनी हा आक्षेप घेतला असून, हे सर्व अर्ज तांत्रिक कारणावरून बाद करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. या वादात शिवसेना शिंदे गटानेही उडी घेत भाजपच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. नियम सर्व पक्षांसाठी समान असले पाहिजेत, असे म्हणत स्कॅन सही असलेले अर्ज फेटाळले जावेत, अशी भूमिका शिंदे गटाने मांडली आहे.
दरम्यान , या आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या छाननीत या प्रकरणावर अंतिम शिक्का बसणार आहे. जर ठाकरे गटाचे अर्ज बाद झाले, तर जळगाव महापालिका निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून भाजप-शिंदे गटासाठी मार्ग सुकर होऊ शकतो.






