मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके
योगिनींनो, म्हणता म्हणता २०२५ हे वर्ष सरलं आणि निरोप घ्यायची वेळ आली सुद्धा. तुमच्याशी योगविषयक संवाद साधता-साधता वर्षाची सांगता आली हे लक्षातही आलं नाही. आनंदाचा काळ पटकन जातो असं म्हणतात ते खरं आहे.
योग - संवादसेतू
वर्षभर या मालिकेद्वारे आपल्याशी संवाद साधणं हा खरोखरच माझ्यासाठी आनंदाचा ठेवा होता. ही लेखमालिका नसती तर, महाराष्ट्राच्या विविध भागांतील इतक्या सख्यांशी एकत्र, एका माध्यमातून माझा संवाद कसा बरं झाला असता? खरं सांगायचं तर ही लेखमालिका लिहिण्यात माझा दुहेरी फायदा होता. एकीकडे मी तुमच्याशी संवाद साधत होते तर दुसरीकडे माझ्या मनातील सखीशीही संवाद साधत होते. इतरांशी काय, स्वतःशी संवाद साधायलाही अलीकडच्या वेगवान जीवनात म्हणावा तसा वेळ मिळत नाही. आणि दुधात साखर म्हणजे आमच्यातील संवादाचा विषयही योग. जिथं संवादाचा विषयच योग असतो तिथं विसंवादाला जागाच नसते. कोणाशीही असलेला सुसंवाद हा आनंद देतो. हा सुसंवाद स्वतःशीच असेल तर काय बहार येत असेल! या योग मालिकेनं मला दिलेलं सर्वात मोठं देणं म्हणजे तुम्हा सगळ्यांशी आणि माझा माझ्याशी घडवून आणलेला सुसंवाद आणि संयोग.
पतंजलीचा अष्टांगयोग - आनंदाचा ठेवा
तसं पाहिलं तर योग हा विषय अत्यंत व्यापक आहे. त्याविषयी लिहावं तेवढं थोडं आहे. निव्वळ विविध आसनं आणि प्राणायाम करायच्या पद्धती सांगायच्या म्हटल्या तरी संपूर्ण वर्ष पुरेल; परंतु 'गागर मे सागर' या उक्तीप्रमाणे लेखमालेत मी योगाचे अधिकाधिक विषय आणि पैलू मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कदाचित वाटेल की मी अगदी मोजक्या आसनांविषयी माहिती दिली. याचं कारण म्हणजे आसन-प्राणायामांविषयी पुष्कळ पुस्तकं तसेच व्हिडीओज पाहायला मिळतात. योगासनांचे वर्गही अनेक ठिकाणी चालतात. त्यामुळे आसनं आणि प्राणायाम शिकण्यासाठी अनेक माध्यमं आहेत; परंतु पतंजलींनी सांगितलेल्या योगाच्या इतर अंगांविषयीची माहिती इतकी सहज उपलब्ध नाही. आसन-प्राणायामां इतकीच इतर अंगंही महत्त्वाची आहेत. खरं तर पारंपरिक योगामध्ये तीच अंगं महत्त्वाची आहेत. शरीरापेक्षा मनाला महत्त्व आहे. बहिरंगापेक्षा अंतरंगात पाहण्यावर भर आहे. शरीराच्या सुदृढतेबरोबर मनाची एकाग्रता, शुद्धता, स्थिरता यावरदेखील भर आहे. शरीराची सुदृढता ही मनाच्या एकाग्रतेकडे नेणारी केवळ एक पायरी आहे. अलीकडच्या काळात योगाच्या या दुर्लक्षित राहिलेल्या भागाकडे तुम्हां सर्वांचं लक्ष मला वेधून घ्यायचं होतं. केवळ शरीराच्या सुदृढतेनं मन निकोप, खंबीर होईल असं नाही, पण मन जर खंबीर आणि नियंत्रित असेल तर व्यक्तिमत्त्वाच्या अंतर्बाह्य पैलूंमध्ये आपोआपच सकारात्मकता यायला लागते. इतर कुठल्याही लाभापेक्षा सुदृढ मन आणि सुदृढ शरीर हा मानवी जीवनातील सर्वात मोठा लाभ आहे. आणि एका अष्टांगयोगाच्या माध्यमानं तो प्राप्त होऊ शकतो हेच योगाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
योगासाठी सहयोग -
योगमालिका लिहिताना पुन्हा एकदा मूळ पातंजलयोगसूत्रं तसेच योगावरील इतर ग्रंथ आणि अनेक श्रेष्ठ योगाचार्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचणं हा माझ्यासाठी आनंदाचा मोठा ठेवा होता. या पुस्तकांचं वाचन व पुस्तकांतील विचारांचं मनन-चिंतन करणं म्हणजे पुनःप्रत्ययाचं समाधान अनुभवणं होतं. लेखनाच्या या सगळ्या प्रवासात मी व्यक्तिश: पुष्कळ संपन्न झाले. पातंजलयोगाचं पारंपरिक पद्धतीनं विस्तृत विवेचन करणारे कृ. के. कोल्हटकरांचं 'भारतीय मानसशास्त्र अथवा पातंजल योगदर्शन' हे पुस्तक तसेच करंबेळकर, स्वामी आनंदऋषी, कोपर्डेकर इत्यादी विद्वानांची पुस्तकं, योगाचार्य निंबाळकर, योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे, बी. के. एस्. अय्यंगार इत्यादी जाणकारांची आधुनिक काळाला अनुसरून, योगाचं उपयोजनात्मक विवरण करणारी पुस्तकं, लेख लिहिताना वेळोवेळी उपयुक्त ठरली. 'ग्रंथ हेच गुरु' या वचनाप्रमाणे खरोखरच या पुस्तकांतून लेखमाला लिहिण्यासाठी पुष्कळ मार्गदर्शन झाले. योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे म्हणजेच अण्णांकडे मी योग शिकले. अण्णा आता नसले तरी त्यांची शिकवण, त्यांच्या प्रेरणादायी विचारांची शिदोरी हे लेख लिहीत असताना सतत शक्ती देत होती.
प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि संत साहित्याचा सखोल अभ्यास असलेल्या, लेखनाचा दांडगा अनुभव असलेल्या डॉ.अंजली पर्वते या माझ्या मैत्रिणीनं वेळोवेळी लेख वाचून कितीतरी उपयुक्त सूचना दिल्या ज्यामुळे हे सदर अधिक रोचक व्हायला मदत झाली. महिलांसाठी असलेलं हे सदर लिहिताना स्त्रीरोगतज्ञ डॉ. उल्का नातू तसेच डॉ. सुवर्णा नेवाळकर या योगशास्त्रप्रवीण मैत्रिणींचीही पुष्कळमदत झाली.
योग - भारताने जगाला दिलेली अपूर्व देणगी
सुमारे ५००० वर्षांची ज्ञानपरंपरा असलेल्या भारत देशानं जगाला अनेक विषयात योगदान दिले आहे; परंतु या सर्व योगदानांमध्ये सर्वश्रेष्ठ, अपूर्व देणगी कुठली असेल तर ती म्हणजे अष्टांगयोगाची. मनाला विशुद्ध समाधान आणि निरंतर शांती प्राप्त करून देणाऱ्या पतंजलींच्या अष्टांगयोगाला धर्म, जात, पंथ, लिंग, वय इतकंच काय तर देशकाळाच्याही मर्यादा नाहीत. म्हणूनच तर दोन हजार वर्षांपूर्वी सांगितलेली ही योगरूप जीवनशैली आजही मानवजातीसाठी तितकीच उपयुक्त ठरत आहे. योगाचं महत्त्व केवळ भारतातच नाही तर जवळ जवळ संपूर्ण विश्वानं आता मान्य केलं आहे. जगातील कित्येक देशांमध्ये योगतत्त्वज्ञान अध्ययन-अध्यापनाचा, अभ्यासक्रमाचा भाग म्हणूनही स्वीकारलं गेलं आहे.
चला तर मग सख्यांनो, अज्ञानातून ज्ञानाकडं नेणाऱ्या, अंध:काराकडून प्रकाशाकडं नेणाऱ्या, या योगमार्गावर सतत वाटचाल करू या, योगिनी होऊ या!
लौकिकार्थानं लेखमाला इथं संपत असली तरी योगमार्गावरील वाटचालीला आता प्रारंभ झाला आहे. ही वाटचाल अशीच सुरू ठेवूया! नित्य आणि निरंतर...