स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील
प्रसूती हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अत्यंत भावनिक व जैविकदृष्ट्या महत्त्वाचा क्षण असतो. बाळ जन्माला येताच त्याच्याशी आईचा पहिला सहवास सुरू होतो आणि या पहिल्या क्षणांचा बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासावर खोल परिणाम होतो. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार, प्रसूतीनंतर लगेचच आई व बाळामध्ये त्वचा-ते-त्वचा संपर्क (स्कीन टु स्कीन कॉनटॅक्ट / कांगारू मदर केअर) ठेवणे हे केवळ भावनिक नाते दृढ करण्यापुरते मर्यादित नसून, ते बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
त्वचा-ते-त्वचा संपर्क म्हणजे कपडे न घातलेले बाळ थेट आईच्या छातीवर ठेवणे, त्यामुळे दोघांच्या त्वचेला थेट स्पर्श होतो. हा संपर्क शक्यतो बाळ जन्मल्यानंतर पहिल्या एका तासाच्या आत सुरू करावा आणि किमान एक तास तरी टिकवावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. या काळात बाळ नैसर्गिकरीत्या स्तनपानाची प्रक्रिया सुरू करते, ज्याला “गोल्डन हवर” असे म्हटले जाते.
या संपर्काचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते. आईच्या शरीराची ऊब ही बाळासाठी नैसर्गिक इनक्यूबेटरसारखी काम करते. प्रसूतीनंतर अनेक बाळांचे शरीराचे तापमान पटकन कमी होते; परंतु त्वचा-ते-त्वचा संपर्कामुळे हायपोथर्मियाचा धोका कमी होतो. विशेषतः कमी वजनाच्या किंवा अकाली जन्मलेल्या बाळांसाठी हा संपर्क जीवनरक्षक ठरू शकतो.
त्वचा-ते-त्वचा संपर्कामुळे बाळाची हृदयगती, श्वासोच्छ्वास आणि ऑक्सिजनचे प्रमाण स्थिर राहते. आईच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज ऐकून बाळ अधिक शांत होते. त्यामुळे बाळाचे रडणे कमी होते आणि त्याचा ताण (stress) कमी होतो. संशोधनातून असेही दिसून आले आहे की या संपर्कामुळे बाळामध्ये मेंदूचा विकास अधिक चांगला होतो.
स्तनपानाच्या दृष्टीने त्वचा-ते-त्वचा संपर्क अत्यंत महत्त्वाचा आहे. बाळाला जन्मताच आईच्या स्तनाशी जवळीक मिळाल्यास स्तनपान लवकर सुरू होते. त्यामुळे कोलोस्ट्रम (पहिले दूध) लवकर मिळते, जे बाळासाठी ‘पहिले लसीकरण’ समजले जाते. यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते, संसर्गाचा धोका कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते.
आईसाठी देखील या संपर्काचे मोठे फायदे आहेत. बाळाच्या त्वचेचा स्पर्श झाल्याने आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन हा हार्मोन मोठ्या प्रमाणात स्रवतो. हा हार्मोन गर्भाशय आकुंचन पावण्यास मदत करतो, त्यामुळे प्रसूतीनंतरचा रक्तस्राव कमी होतो. तसेच, आईचे नैराश्य कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि मातृत्वाची जाणीव अधिक दृढ होते. प्रसूतीनंतर अनेक महिलांमध्ये होणारे “Postpartum Depression” याचा धोका त्वचा-ते-त्वचा संपर्कामुळे कमी होण्यास मदत होते.
समाजामध्ये अजूनही काही गैरसमज आहेत की बाळाला आंघोळ घातल्याशिवाय आईच्या छातीवर ठेवू नये किंवा प्रथम तपासण्या झाल्याशिवाय संपर्क करू नये. प्रत्यक्षात, बाळ पूर्णपणे स्थिर असेल तर प्राथमिक तपासण्या आईच्या छातीवर ठेवूनही करता येतात. त्यामुळे वैद्यकीय दृष्टिकोनातून त्वचा-ते-त्वचा संपर्कात विलंब करण्याचे कारण नसते.
सिझेरियननंतर देखील शक्य असल्यास त्वचा-ते-त्वचा संपर्क ठेवणे अत्यंत उपयुक्त ठरते. काही वेळा आई थकलेली किंवा भूलखाली असल्यास, वडिलांनाही हा संपर्क ठेवता येतो. त्यामुळे बाळाला सुरक्षिततेची भावना मिळते आणि पालक व बाळातील नातेसंबंध मजबूत होतात.
स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून माझा ठाम विश्वास आहे की त्वचा-ते-त्वचा संपर्क हा प्रसूतीनंतरच्या काळातील सर्वात सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी उपचार आहे. तो कोणत्याही औषधाविना बाळाच्या व आईच्या आरोग्यासाठी चमत्कारिक परिणाम देऊ शकतो.
निष्कर्षतः, त्वचा-ते-त्वचा संपर्क हा आधुनिक मातृत्वसेवेचा एक अविभाज्य घटक असावा. प्रत्येक बाळाला जन्मानंतर आईच्या छातीत सुरक्षितपणे विसावण्याचा हक्क आहे आणि प्रत्येक आईला तिच्या बाळाशी पहिल्याच क्षणी हे नाते जोडण्याचा अधिकार आहे. सुरक्षित, सुदृढ आणि आनंदी भविष्याकडे नेणारा हा पहिला स्पर्श आहे.