अजुनही वेळ गेलेली नाही, भाजपने आपल्या कोटयातील १२ जागांवर माघार घेवून रिपब्लिकन कार्यकर्त्यांना संधी द्यावी अन्यथा ३८ जागांवर मैत्रीपूर्ण लढण्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा ईशारा
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असणा-या रिपब्लिकन पक्षाकडे भाजपने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मान देण्यात आलेला नाही. रिपब्लिकन पक्षाकडे पूर्ण दुर्लक्ष करुन रिपब्लिकन पक्षाचा अवमान करण्याची भाजपची भुमिका ही निषेधार्ह आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे रिपब्लिकन पक्ष भाजप आणि एनडीए सोबत मजबुतीने उभा आहे. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आणि रज्यभरातील अनेक महानगरपालिकांमध्ये रिपब्लिकन पक्षावर भाजपने जागा वाटपात अन्याय केलेला आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षात तीव्र नाराजी आहे.महायुतीत सन्मानाचे जागा वाटप झाले नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणुक लढणार आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केले.
अजुनही वेळ गेलेली नाही. भाजपने त्यांच्या काही जागांवर माघार घ्यावी. किमान १० ते १२ जागा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोडाव्यात. फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस असला तरी माघार घेण्यासाठी अजुन वेळ आहे. रिपब्लिकन पक्षाला हव्या असणा-या १० ते १२ जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला सोडाव्यात. अन्यथा रिपब्लिकन पक्षाला मुंबईत ३८ जागांवर मैत्रीपूर्ण लढत द्यावीच लागेल. मुंबईत स्वबळावर निवडणुक लढण्यास रिपब्लिकन पक्ष सज्ज असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज बांद्रा येथील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
रिपब्लिकन पक्षाने मागील १० दिवसांपूर्वीच भाजपकडे आपल्याला हव्या असणा-या २६ जागांची यादी दिली होती . त्यातील १५ ते १६ जागा जरी भाजपने रिपब्लिकन पक्षाला सोडल्या असत्या तरी महायुतीचा धर्म पाळल्याचे जाहीर झाले असते. गेल्या १० दिवसांपासुन जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला बोलावले नाही. रिपब्लिकन पक्षाला केवळ झुलवत ठेवले. शेवटच्या क्षणापर्यंत जागा देणार असे सांगत असताना प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाला जागा दिल्याच नाहीत. काल सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करुन ६ ते ७ जागा सोडत असल्याचे मला सांगितले. मात्र त्या जागा रिपब्लिकन पक्षाने मागितल्याच नव्हत्या. ज्या जागा रिपब्लिकन पक्षाने मागितल्या नाहीत, त्या जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याचा अर्थ काय, ? आम्ही तर कमळ चिन्हावर निवडणुक लढण्याचा रिपब्लिकन पक्षाचा प्रस्तावही भाजपला दिला होता. तरीही भाजपने रिपब्लिकन पक्षाला हव्या असणा-या जागा सोडल्या नाहीत. याकडे आपण मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले असे ना रामदास आठवले यांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे रिपब्लिकन पक्षाचा अवमान करण्याचे धोरण दिसत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, धुळे, मिरा-भायंदर, आदि अनेक ठिकाणी महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला एकही जागा भाजपने महायुतीतुन सोडलेली नाही. रिपब्लिकन पक्षाचा हा घोर अवमान आहे. रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सर्वप्रथम मित्रपक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाने युती केल्यानेच भाजप-शिवसेना युतीची महायुती झाली. मात्र महायुतीचा प्रमुख घटक असणा-या रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष करणे हा रिपब्लिकन पक्षावर प्रचंड अन्याय भाजपने केलेला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ४० जांगांवर रिपब्लिकन पक्ष मैत्रीपूर्ण लढत लढण्यास सज्ज आहे. असे ना. रामदास आठवले म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे विकास पुरुष असणारे नेतृत्व आहे. त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारके या देशात उभी केली. इंदु मिल मध्येही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उंच पुतळा आणि भव्य स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्यात येणार आहे. त्यांचे काम चांगले आहे, त्यामुळे रिपब्लिकन पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप आणि एनडीए सोबत देशभरात साथ देत आहे.
महाराष्ट्रात मित्र पक्ष भाजप आणि महायुती रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष करीत आहे. रिपब्लिकन पक्षाची मुंबई आणि महाराष्ट्रात मोठी ताकद आहे. मुंबईत 1992 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक आणि महापौरही निवडुन आला होता. त्यानंतर मुंबई रिपब्लिकन पक्षाचे ५ नगरसेवक होते. रिपब्लिकन पक्षाची मुंबईत प्रचंड ताकद आहे. ताकद असतानाही रिपब्लिकन पक्षाकडे भाजप दुर्लक्ष करीत आहे. सुरुवातीला जागा सोडतो असे सांगुन शेवटच्या क्षणी एकही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडली नाही ही रिपब्लिकन पक्षाची फसवणुक आहे. रिपब्लिकन पक्षांवर झालेला हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. भाजपकडुन रिपब्लिकन पक्षाचा महानगरपालिका निवडणुकीत सतत अपमान करण्याचे धोरण सुरु आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष स्वबळावर मुंबई महानगरपालिका निवडणुक लढणार आहे. २०१२ मध्ये रिपब्लिकन पक्षाला २४ जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला १७ जागा सोडल्या होत्या. यंदाही त्यांनी १० ते १२ जागा सोडायला पाहिजे होत्या, मात्र एकही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडली नाही. जागा सोडतो असे सांगुन शेवटच्या क्षणापर्यंत रिपब्लिकन पक्षाला झुलवत ठेवून एकही जागा न देता रिपब्लिकन पक्षाची भाजप महायुतीने फसवणुक केलेली आहे. मात्र तरीही अजुनही वेळ गेलेली नाही, भाजपने रिपब्लिकन पक्षाला १० ते १२ जागा सोडाव्यात, काही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी माघार घ्यावी आणि रिपब्लिकन पक्षाला हव्या असणा-या जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला सोडाव्यात. रिपब्लिकन पक्षाची ताकद असणा-या १० ते १२ जागांवर रिपब्लिकन उमेदवारांसाठी भाजपच्या उमेदवारांनी माघार घ्यावी. अन्यथा रिपब्लिकन पक्षाला मुंबईत ३८ पेक्षा जास्त जागांवर महायुतीशी मैत्रीपूर्ण लढत द्यावी लागेल असा इशारा ना. रामदास आठवले यांनी आज दिला.