बांधकाम प्रकल्पांना उपाययोजना करण्याचे निर्देश
मुंबई : मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. मुंबईतील बांधकाम प्रकल्प आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे वायुप्रदूषण होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने वायुप्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांना, प्रकल्पांना कारणे दाखवा, काम बंद नोटिसा बजावण्यात सुरुवात केली आहे. आता म्हाडाच्या मुंबई मंडळाने जागे होत वायुप्रदूषण रोखण्यासाठी, वायुप्रदूषण नियंत्रण नियमावलीचे कोठर पालन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मंडळाने ६०० बांधकाम प्रकल्पांना (म्हाडा वसाहत पुनर्विकास प्रकल्प आणि म्हाडा गृहनिर्माण) पत्र पाठवून नियमावलीचे पालन करण्यासह आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश विकासक, कंत्राटदारांना दिले आहेत. तर वायुप्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास काम बंद नोटीस बजावू, असा इशाराही पत्राद्वारे विकासक, कंत्राटदारांना दिला आहे.
मुंबईत वायुप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून याप्रश्नी उच्च न्यायालयानेही पालिकेच्या कारभारावर ताशेरेही ओढले आहेत. तसेच कडक कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. या आदेशानंतर पालिका अधिकाऱ्यांकडून प्रकल्पस्थळी जाऊन पाहणी करून कारणे दाखवा नोटीसा वा काम बंद नोटीस देण्याच्या कामास वेग देण्यात आला आहे.
१ ते २४ डिसेंबरदरम्यान पालिकेने ५०२ कारणे दाखवा नोटीसा, तर १८७ काम थांबविण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. पालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर आता मुंबई मंडळानेही वायुप्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईमध्ये विविध ठिकाणी म्हाडाचे शंभरपेक्षा अधिक अभिन्यास आहे. या अभिन्यासातील म्हाडा वसाहतीतील मोठ्या संख्येने इमारती जुन्या झाल्या असून दुरुस्तीच्या पलीकडे गेल्या आहेत. त्यामुळे अनेक इमारतींचा सध्या पुनर्विकास सुरु आहे. या पुनर्विकासाच्या कामामुळे तसेच म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पामुळे वायुप्रदूषण होऊ नये यासाठी आता मुंबई मंडळाने आवश्यक ती काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मंडळाने ६०० बांधकामांना (म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास आणि म्हाडा गृहनिर्माण) पत्र पाठवून पालिकेच्या वायुप्रदूषण नियंत्रण नियमावलीचे कठोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर सर्व कार्यकारी अभियंत्यांना प्रकल्प स्थळांची पाहणी करून नियमावलीचे उल्लंघन होत नाही ना, याची पाहणी करण्याची सूचना म्हाडामार्फत करण्यात आली आहे. तसेच ६०० प्रकल्पांना पत्र पाठविण्यात आले असून वायुप्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास म्हाडाकडूनही काम बंदची कारवाई केली जाणार आहे.






