मोहिनी गर्गे - कुलकर्णी : कर्तृत्ववान ती राज्ञी
वैशाली गायकवाड
आयुष्याचा प्रवास कधीही सरळ रेषेत नसतो; तो वळणावळणांचा आणि संघर्षाचा असतो. मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यात शिकलेली एक मुलगी जेव्हा देशाच्या सीमेवर शत्रूशी दोन हात करते आणि निवृत्तीनंतर लेखणीच्या माध्यमातून भारतीय वीरांगणांचा इतिहास जगासमोर आणते, तेव्हा तो प्रवास विलोभनीय ठरतो. हा प्रवास आहे एका अशा कणखर व्यक्तिमत्त्वाचा, ज्यांनी 'वर्दी' केवळ अंगावर चढवली नाही, तर ती कायमची आपल्या तनमनात भिनवून घेतली. भारतीय सैन्यदलातील अधिकारी ते संशोधनाधिष्ठित लेखिका, समुपदेशिका, प्रेरक वक्ता असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व "मेजर मोहिनी गर्गे–कुलकर्णी (निवृत्त)" यांची प्रेरणादायी यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत.
बालपणी सायकलिंग करत शाळेत जाणे असो वा चित्रकला, नाटक आणि शास्त्रीय संगीताची ओढ असो, यातूनच त्यांच्या चौफेर व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मोहिनी यांना वडिलांनी भारताच्या विविध प्रांतांची ओळख करून दिली. घरातून मिळालेला राष्ट्रभक्तीचा वारसा आणि इतिहासातील शौर्यकथांनी त्यांच्या मनात मूल्यांवर आधारित जीवनाची जाणीव निर्माण केली. आजोबांकडून मिळालेले गीता पठणाचे संस्कार आणि योगाभ्यासाची जोड यामुळे त्यांना भविष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे मानसिक बळ मिळाले.
छ. संभाजीनगर इथून त्यांनी प्रथम श्रेणीत कायद्याची पदवी (L.L.B)प्राप्त केली. भारतीय संविधान आणि कामगार कायदे या विषयांमध्ये विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे इथून विधिशाखेत पदव्युत्तर (L.L.M) पदवी मिळवली. महाविद्यालयीन काळात रायफल शूटिंग आणि हॉर्स रायडिंगमध्ये त्यांनी नैपुण्य मिळवले. १९९९ च्या कारगील युद्धाच्या बातम्यांनी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम केला आणि तिथूनच सैन्यात जाण्याची ओढ निर्माण झाली. सैन्यदलात निवड झाल्यानंतरचा प्रशिक्षणाचा काळ अत्यंत खडतर होता. ४० किलोमीटर पाठीवर ओझे घेऊन धावणे, शारीरिक थकवा आणि मानसिक ताण यावर त्यांनी 'अर्जुन आणि श्रीकृष्ण' स्वतःच बनून मात केली.
त्यांची पहिली नियुक्ती काश्मीरमधील अत्यंत संवेदनशील आणि दहशतवादग्रस्त भागात झाली. तिथे त्या एकमेव महिला अधिकारी होत्या. हिंसेचे विदारक दृश्य, स्फोटानंतर जवानांचे अवशेष गोळा करणे यांसारख्या प्रसंगांनी त्यांना हादरवून सोडले, पण वर्दीतील शिस्तीने त्यांना डगमगू दिले नाही. एक स्त्री म्हणून नेतृत्व करताना त्यांनी आपल्या संवेदनशीलतेचा वापर जवानांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी केला, तर गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालताना त्या तितक्याच कठोरही राहिल्या. जवानांना धैर्य देत, स्वतः खंबीरपणे उभं राहणं, हेच त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य ठरलं.
कौटुंबिक जबाबदाऱ्या, सततच्या बदल्या आणि दोन सुकन्यांचे संगोपन करताना पती वैभव कुलकर्णी यांची भक्कम साथ त्यांना लाभली. डिसेंबर २०१६ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली; मात्र त्यानंतरही त्यांचा राष्ट्रसेवेचा प्रवास थांबला नाही.
निवृत्तीनंतर त्यांनी संशोधन, लेखन आणि अध्यापनाचा मार्ग स्वीकारला. संस्कृत विशारद पदवी, भगवद्गीतेचा अभ्यास, मानसशास्त्रीय प्रशिक्षण यामुळे त्यांच्या लेखनाला सखोलता लाभली. चार वर्षांच्या संशोधनातून साकारलेला "अपराजिता -गाथा भारतीय वीरांगनांची "गुगललाही माहीत नसलेल्या भारतातील कानाकोपऱ्यातील स्त्रियांचे प्रशासकीय आणि युद्धकौशल्य जगासमोर मांडले.हा ग्रंथ भारतीय इतिहासातील गेल्या २००० वर्षांतील निवडक ६३ वीरांगणांच्या शौर्याचा तेजस्वी दस्तऐवज ठरला आहे. हे लेखन म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी अनमोल ठेवा आहे. या विषयावरचा हा भारतातला पहिलाच प्रकल्प असल्याने या गौरवग्रंथाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयातर्फे राज्यातल्या सर्व शासकीय ग्रंथालयांमध्ये समाविष्ट करण्यासाठी अपराजिता ग्रंथाची निवड झाली आहे.
वृत्तपत्र, नियतकालिकं, समाज माध्यम यामध्ये मेजर मोहिनी प्रामुख्याने इतिहासातील स्त्री शक्ती, कायदा, युद्धशास्त्र, शौर्यकथा संरक्षण दलांचा प्रेरक इतिहास अशा विविध विषयांवर लेखन करतात. दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीतील त्यांचे युद्धकथा हे सदर खूपच लोकप्रिय आहे. व्यक्तिमत्त्व विकास, सेना दलातल्या संधी, नेतृत्व गुण, पालकत्व, स्त्री सक्षमीकरण, तणाव व्यवस्थापन, संतुलित जीवन पद्धती इत्यादी विषयांवर विविध सामाजिक आणि औद्योगिक संस्था महाविद्यालय तसेच अॅकॅडमींमधून त्या व्याख्याने देतात. आकाशवाणी दूरदर्शन वृत्तवाहिन्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवरच्या कार्यक्रमांमध्ये ही निमंत्रित वक्ता म्हणून मेजर मोहिनी यांचा सहभाग असतो. वंचित मुला-मुलींसाठी काम करणाऱ्या काही सेवाभावी संस्थांसाठी सुद्धा त्या मार्गदर्शन करतात.
अपराजिता या ग्रंथाचे लेखन आणि समर्पित समाज प्रबोधनात्मक पवित्र कार्यासाठी मेजर मोहिनी यांना 'धरित्रीच्या लेकी' या पुरस्काराने, बार कौन्सिल ऑफ इंडियाचा बेस्ट स्पीकर तसेच नवदुर्गा, नारीशक्ती अशा सन्मानित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
दोन मुलींना वाढवताना भगवद्गीता हा त्यांच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्या नमूद करतात, तसेच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करून जगाच्या पटलावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करावी अशा सदिच्छा त्या व्यक्त करतात. अपराजिता या त्यांच्या ग्रंथाची तिसरी आवृत्ती लवकरच आपल्या भेटीला येणार आहे, आर्मीचे विविध पैलू व्याख्यानांच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी त्या प्रयत्नशील असणार आहेत. राहून गेलेल्या गोष्टींमध्ये भविष्यात शास्त्रीय संगीत शिकण्याचा, फिटनेसकडे लक्ष देत स्वतःच्या क्षमता वाढवण्याचा त्यांचा मानस आहे.
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेखाली सशक्त व बलशाली होण्याच्या या प्रवासात सामान्य माणसाला देखील डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये सहभागी होण्याची ओढ निर्माण होत असल्याचे मोहिनी ताई अभिमानाने सांगतात. पालकांनी आपल्या मुलांना 'कम्फर्ट झोन'च्या बाहेर काढून संघर्षाची चव चाखू द्यावी, विज्ञानासोबतच मूल्यांची जोड देणे आवश्यक आहे, कारण तंत्रज्ञान आपल्याला मूल्ये शिकवू शकत नाही "उद्धरेत आत्मनात्मानम्" म्हणजेच स्वतःचा उद्धार स्वतःच करणे, हा संदेश त्या सगळ्यांना देतात.
आज त्या एक यशस्वी लेखिका, वक्ता आणि मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. ध्येय आणि मनाचा निश्चय पक्का असेल, तर स्त्री कोणत्याही क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवू शकते. एका लष्करी अधिकाऱ्याचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यश नसून तो येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. शस्त्रास्त्र आणि शब्दास्त्र दोन्हींवर प्रभुत्व असणाऱ्या या कलमधारणी वीरनारीने अनुकरणीय असा आदर्श आपल्या सगळ्यांसमोर ठेवला आहे. चला तर मग, फक्त ठरवण्यात वेळ घालवण्यापेक्षा येत्या नवीन वर्षाचे कृतिशील स्वागत करून संकल्पपूर्तीकडे वाटचाल करूया.