Monday, December 29, 2025

एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले आहेत. आता एका प्रश्नासाठी पाच पर्याय उमेदवारांना दिले जाणार आहेत. यापैकी कोणताही एका पर्यायाचे वर्तुळ रंगविणे बंधनकारक असेल. असे न केल्यास प्रत्येक उत्तरासाठी २५ टक्के गुण कापले जाणार आहेत. एक मार्च २०२६ नंतर होणाऱ्या परीक्षांपासून हे बदल लागू असणार आहेत. ‘एमपीएससी’ मार्फत नुकतीच याबाबतची सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना उत्तरपत्रिकेबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आयोगामार्फत उत्तरपत्रिका दोन भागात विभागण्यात आली आहे. भाग १ आणि भाग २ अशी ही उत्तरपत्रिका असणार आहे. भाग १ हा केवळ प्रश्नांची उत्तरे नोंदविण्यासाठी असून, भाग २ मध्ये उमेदवाराच्या नावासह बैठक क्रमांक, विषय सांकेतांक प्रश्नपत्रिका क्रमांक तसेच स्वाक्षरी असा तपशील असणार आहे. परीक्षा संपल्यानंतर पर्यवेक्षकांमार्फत भाग १ व २ वेगवेगळे केले जाणार आहेत. यामुळे उत्तरपत्रिका मूल्यमापनाबद्दल गोपनीयता राखली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच आता प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चारऐवजी पाच पर्याय दिले जाणार आहेत. उत्तराचे चार पर्याय व उत्तर येत नसेल तर पाचवा पर्याय, असे हे पाच पर्याय असणार आहेत. चारपैकी कोणताच पर्याय निवडायचा नसल्यास, उमेदवाराला पाचव्या पर्यायाचे वर्तुळ रंगवावे लागणार आहे. पाचपैकी एकही वर्तुळ रंगवलेले नसल्यास, त्या प्रश्नासाठी २५ टक्के गुण कापले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना आता उत्तराचा पर्याय रंगविणे बंधनकारक आहे.

  1. कोणताही एका पर्यायाचे वर्तुळ रंगविणे बंधनकारक
  2. तसे न केल्यास प्रत्येक उत्तरासाठी २५ टक्के गुण कापले जाणार
  3. १ मार्च २०२६ नंतर होणाऱ्या परीक्षांपासून हे बदल लागू होणार

उत्तरपत्रिका अवैध

आयोगामार्फत अजूनही काही नियम जाहीर करण्यात आले आहेत. उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरी केलेली नसल्यास तसेच काळ्या बॉल पाईंट पेनव्यतिरीक्त इतर पेन वापरल्यास, उत्तरपत्रिकेवर अनावश्यक मजकूर, चिन्हे, अन्य माहिती नमूद केल्यास उत्तरपत्रिका अवैध ठरविली जाणार आहे.

Comments
Add Comment