डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघडकीस आला आहे. भाजप आणि शिंदे गटातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यामुळे युतीतील नाराजी आता सार्वजनिक स्वरूप घेत आहे. प्राप्त माहितीनुसार, महायुतीतील १५ ते २० नाराज इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीतील उबाठा आणि मनसेशी संपर्क वाढवत असल्याचे दिसते. कल्याण–डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) जागावाटपावरून तीव्र रस्सीखेच सुरू आहे.
वरिष्ठ पातळीवर युती टिकवण्यासाठी बैठका सुरू असल्या तरी, स्थानिक पातळीव अस्वस्थता वाढत आहे. कोणता प्रभाग कोणाकडे जाईल, कोणाचे तिकीट कापले जाईल, याबाबत स्पष्टता नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. युती झाली, तर अनेकांना उमेदवारी गमवावी लागेल, ही भीती नाराजीचे केंद्रबिंदू ठरत आहे. उबाठा आणि राज ठाकरे यांनी महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत.
महाविकास आघाडी अधिक आक्रमक झाली असून, महायुतीतील नाराज घटकांना आकर्षित करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. कल्याण ७–८ आणि डोंबिवलीतील १०–१२ इच्छुकांनी पर्यायी राजकीय मार्ग शोधण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आहे. भाजप आणि शिवसेनेकडून (शिंदे गट) स्वतंत्रपणे पॅनलनिहाय १२२ जागांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यात येत आहेत. मात्र, अंतिम क्षणी युतीचा निर्णय झाला, तर अनेकांची राजकीय गणिते कोलमडण्याची शक्यता आहे. वॉर्ड आपल्या पक्षाकडे गेला तरी उमेदवारी मिळेल याची खात्री नसल्यामुळे अस्वस्थता अधिक तीव्र होत आहे.
कल्याण–डोंबिवली हा पारंपरिक शिवसेना बालेकिल्ला असला तरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गेल्या काही वर्षांत भाजपची संघटनात्मक ताकद वाढवली आहे. बदलापूर आणि अंबरनाथ येथील नगराध्यक्षपदाच्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, कडोंमपामध्ये महापौर बसवण्याचे स्वप्न भाजप पाहू लागले आहे. ही वाढती ताकद आणि शिवसेनेतील (शिंदे गट)अंतर्गत कोंडी महायुतीसाठी डोकेदुखी ठरत आहे.
जागावाटपावर लवकर निर्णय झाला नाही, तर महायुतीतील नाराजी उघड बंडखोरीत होण्याची शक्यता आहे. निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई न राहता, आगामी विधानसभा निवडणूकीची नांदी ठरणार का, याकडे लक्ष आहे.






