मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी, एका विधानाने मुंबईच्या राजकारणात वादळ निर्माण केले आहे. एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी 'मुस्लिम महापौर' बद्दल एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानला प्रत्युत्तर देत महाराष्ट्र राज्य मत्स्यमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी पठाण यांचा समाचार घेतला आहे. तर राणेंनी स्पष्ट सांगितले की, मुंबईत फक्त 'आय लव महादेव'च चालणार.
नितेश राणेंनी घेतला पठाणांचा समाचार
नितेश राणे म्हणाले, "वारिस पठाण हे विसरले आहेत की ते अशा हिंदू राष्ट्रात राहतात जिथे शरिया कायदा लागू नाही. येथील महापौर हिंदुत्व विचारसरणीचा असेल, कारण मुंबईच्या डीएनएमध्येच हिंदुत्व आहे. देशात जिथे जिहादी मानसिकतेचे महापौर बनले आहेत, तिथे हिंदूंना संपवण्याचे काम झाले आहे. हिंदूंची संख्या कमी करून इस्लाम राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न झाले आहे. मात्र या प्रकारचे कोणतेच षडयंत्र वारिस पठाण किंवा त्यांच्या पाकिस्तानातील नेत्यांना आम्ही त्यांना यशस्वी करू देणार नाही." तर मुंबईची जनता हर हर महादेव म्हणणाऱ्या व्यक्तीलाच महापौर बनवेल असा विश्वास ही राणेंनी यावेळी व्यक्त केला.
वारिस पठाण काय म्हणाले?
वारिस पठाण यांनी अलिकडेच एक विधान केले होते की, असा दिवस येईल जेव्हा मुंबईचा महापौर हिजाब घातलेली महिला असेल. मुंबईत मुस्लिम महापौर का असू शकत नाही? यावर त्यांनी संविधानाचा दाखला देत युक्तीवाद केला होता. भारतीय संविधान समानतेचा पुरस्कार करते, तर खान, पठाण, शेख, कुरेशी किंवा अन्सारी महापौर का होऊ शकत नाहीत? या वक्तव्यामुळे इतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार आहेत. यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर निकाल दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १६ जानेवारी रोजी जाहीर केले जातील. यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने व्यस्त आहेत. प्रचारच्या रणधुमाळींसाठी सभांचे नियोजन लवकरच सुरू होईल. तर सध्या कोणाला उमेदवारी द्यावी? यासाठी बैठकांचा धडाका सुरू आहे.