३१ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू
नवी मुंबई : अकासा एअर या विमान कंपनीकडून ३१ डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते गुजरातच्या अहमदाबाददरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा आठवड्यातून एकदा चालविण्यात येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानांची ये-जा २५ डिसेंबरपासून सुरू झाली असून, प्रवासी सेवेत आल्यानंतर अकासा एअरने या विमानतळाला अहमदाबादशी थेट जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या लाँचमुळे ग्रीनफील्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सेवा सुरू करणाऱ्या प्रारंभीच्या विमान कंपन्यांपैकी अकासा एअर एक ठरली आहे. या मार्गावरील फ्लाइट क्रमांक क्यूपी १९१६ दर बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळी ५.४० वाजता रवाना होऊन सायंकाळी ६.५० वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर या मार्गावरील विमानसेवेची वारंवारता वाढविण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या थेट सेवेचा लाभ व्यावसायिक प्रवासी तसेच गुजरात–महाराष्ट्रदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी कनेक्टिव्हिटीला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.