नवी मुंबईत ‘भगत’कुटुंबातील उमेदवारीवरून वाद
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. एकाच घरातील व्यक्तींना तीन ते चार, तर काही ठिकाणी चार ते पाच जागांची उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघाशी संबंधित नेत्यांनी केला आहे.
निवडणुकांचे बिगूल वाजले असून काही पक्षांनी उमेदवार निश्चित करून प्रचारालाही सुरुवात केली आहे. नवी मुंबईत भाजपच्या अंतर्गत गोटात उमेदवारीवरून अस्वस्थता वाढताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक १८ मध्ये एकाच कुटुंबाला एकापेक्षा अधिक तिकीट देण्याच्या हालचालींमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना एका भाजप पदाधिकाऱ्याने सांगितले की, “२०१४ नंतर देशातील राजकीय वातावरण बदलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचे विचार देशभर पोहोचले. भाजपचे कार्यकर्ते तन-मन-धन अर्पण करून काम करतात. सहा वर्षांत पक्षात प्रवेश केलेल्या काही व्यक्ती चार-चार तिकिटांची मागणी करत आहेत.” या पदाधिकाऱ्यांनी पुढे आरोप केला की, “अयोध्येत राम मंदिर उद्घाटन, कलम ३७० हटविणे, पंतप्रधानांचा वाढदिवस आणि १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविले जाणारे सेवा कार्यक्रम – या कोणत्याही उपक्रमांत संबंधित मंडळींचा सहभाग दिसून आला नाही. पक्षाचे नाव वापरायचे, मात्र पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहायचे.
कार्यकर्त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की प्रभाग क्रमांक १८ मधील दशरथ भगत यांना एकापेक्षा जास्त तिकीट देऊ नये आणि निष्ठावंत, सातत्याने काम करणाऱ्यांना संधी द्यावी. २०१९ मध्ये दशरथ भगत, निशांत भगत आणि संदीप भगत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांच्या बॅनरवर कमळाचे चिन्ह, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा स्थानिक आमदारांचे फोटो लावले नसल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे. पक्षाने योग्य आणि न्याय्य निर्णय घेतला तर उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही मेहनत करू, मात्र तसे न झाल्यास “आम्हाला आमचा मार्ग वेगळा घ्यावा लागेल”, असा सूचक इशाराही काही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.






