ठाणे : ब्रेन डेड घोषित झालेल्या ३८ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाच वेळी सहा रुग्णांना नवे आयुष्य मिळाले आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही ठाण्यातील एका कुटुंबाने धैर्याने घेतलेल्या निर्णयामुळे सहा गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकले. ठाण्यात घडलेली ही पहिलीच अवयवदानाची घटना असून ठाणे, मुंबई आणि दिल्लीतील रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले आहेत.
हाजुरी परिसरात राहणाऱ्या या महिलेला मेंदूत रक्तस्राव झाल्याने १९ डिसेंबर रोजी महावीर जैन हॉस्पिटल आणि प्रताप आशर कार्डियाक सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच २५ डिसेंबर रोजी डॉक्टरांनी महिलेला ब्रेन डेड घोषित केले. या अत्यंत कठीण क्षणी डॉक्टरांनी कुटुंबीयांशी संवाद साधत अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले. समाजहिताचा विचार करत कुटुंबीयांनी आपल्या वैयक्तिक दुःखावर मात करत अवयवदानाचा मोठा निर्णय घेतला.
२६ डिसेंबर रोजी शेवटी डॉक्टरांनी आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने अवयव काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेत यकृत, दोन मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड आणि फुफ्फुस अशा सहा महत्त्वाच्या अवयवांचे दान करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. ठाण्याहून पवईपर्यंत अवघ्या १७ मिनिटांत हृदय पोहोचवण्यात आले आणि एका रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आले.
या अवयवदानातून पाच अवयव मुंबईतील रुग्णांना, तर एक अवयव ठाण्यातील रुग्णाला प्रत्यारोपणासाठी देण्यात आला. महिलेच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून जैन ट्रस्ट आणि महावीर जैन हॉस्पिटलतर्फे तिच्या ९ वर्षांच्या मुलीच्या भविष्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये, अशा एकूण दोन लाख रुपयांची मुदत ठेव देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
ब्रेन डेड घोषित झाल्यानंतर ठराविक वेळेत अवयवदान झाल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. यासाठी नागरिकांमध्ये अधिक जनजागृती होणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ. विनीत रणवीर यांनी सांगितले आहे.