३ जानेवारीपासून यात्रेला प्रारंभ; तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा सक्रिय
मुरबाड : २२६ वर्षाची परंपरा असलेल्या व नवसाला पावणाऱ्या म्हसोबाची यात्रा ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी मुरबाड प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत. तहसीलदार देशमुख यांनी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभाग, महावितरण कंपनी, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती बांधकाम विभाग, मुरबाड बस आगार आदी सर्व संबंधित विभागांना लेखी आदेश देत आवश्यक सूचना केल्या आहेत. त्यानुसार सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत असून यात्रेच्या तयारीला वेग आला आहे.
मुरबाडपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हसा गावी दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमेला ही यात्रा भरते. म्हसोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छ व पुरेसे पाणी मिळावे यासाठी मुरबाड पाणीपुरवठा विभागाने बोअरवेल व विहिरींची दुरुस्ती व स्वच्छता करून पाणीपुरवठा सुनिश्चित केला आहे. तसेच यात्रेदरम्यान अखंड वीजपुरवठा राहावा यासाठी महावितरण कंपनीने आवश्यक व्यवस्था केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी मुरबाड बस आगाराने जादा व चांगल्या दर्जाच्या बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी केली असून, आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. प्राथमिक उपचार, आरोग्य सेवा आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एकूणच यात्रेच्या नियोजनावर प्रशासनाची बारकाईने लक्ष असून, म्हसोबाची यात्रा शांततेत, सुरक्षिततेत आणि उत्साहात पार पडावी यासाठी मुरबाड प्रशासन पूर्ण ताकतीने सज्ज झाले आहे.






