ठाणे : दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. बिबट्या वनक्षेत्र सोडून वारंवार मानवीवस्तीत प्रवेश करत आहे. गावातच नाही तर शहरातही बिबट्याची दहशत वाढली आहे. शहरात देखील बिबट्याचा वावर वाढला आहे. ठाण्यासह कल्याण , मुरबाड आणि बदलापूर या शहरात बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना रात्रीअपरात्री बाहेर पडणे कठीण झाले आहे. बदलापूरच्या आंबेशिव, कारवापाठोपाठ आता वांगणी गावात बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण आहे.
बदलापूरमधील वांगणी (काराव) भागात बिबट्याची दहशत वाढली आहे. शिवाजीनगर जुना भेंडी पाडा परिसरातील लोकवस्तीत घुसून बिबट्याने दोन कुत्र्यांची शिकार केली. भर लोकवस्तीत घुसून बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिक चिंतेत आहेत. बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्याचे समजताच वन विभागाचे पथक वांगणी गावात दाखल झाले. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
स्थानिकांना एक मादी बिबट्या आणि तिच्यासोबत दोन बछडे दिसले. ढोके, दापिवली, पिंपकोळी येथे तसेच वारली पाड्यातील परिसरात शुक्रवारी बिबट्या दिसला. त्यामुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.ठाणे वनविभागाने तीन ट्रॅप आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही हा बिबट्या अद्याप अडकलेला नाही. वनविभागाकडून त्याचा शोध सुरू आहे .
नागरिकांसाठी सूचना:
- रात्रीच्या वेळी जंगलाजवळ किंवा दाट झाडीच्या परिसरात जाणे टाळा.
- पाळीव प्राण्यांची काळजी घ्या आणि त्यांना घराबाहेर एकटे सोडू नका.
- बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभाग किंवा स्थानिक पोलिसांना माहिती द्या.
बिबट्या दिसल्यास काय काळजी घ्यावी ? :
- शांत राहा: घाबरू नका आणि पळू नका, कारण बिबट्या वेगाने पळतो.
- मोठे दिसा: हात वर करा, मोठा आवाज करा, काठी किंवा टॉर्चचा वापर करा.
- हळू हळू मागे सरका: पाठ दाखवू नका आणि हळू हळू मागे फिरा.
- वनविभागाला कळवा: त्वरित 1926 वर फोन करून माहिती द्या.
- गर्दी करू नका: बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी करू नका.