भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या अटी; महायुतीत खळबळ
भाईंदर : मीरा–भाईंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले असून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेसमोर कठोर अटी ठेवल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या अटी मान्य न झाल्यास भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल, असा थेट इशाराच मेहता यांनी दिल्याने मीरा–भाईंदरमधील भाजप–शिवसेना युती धोक्यात आल्याचे चित्र आहे. पत्रकार परिषदेत मेहता यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप करत गेल्या महिनाभरात भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांना फोडण्यात आल्याचा दावा केला. शिवसेनेने पक्षात घेतलेले भाजपचे सर्व कार्यकर्ते तात्काळ सन्मानपूर्वक परत करावेत, ही पहिली आणि महत्त्वाची अट त्यांनी मांडली. युती टिकवायची असेल, तर कार्यकर्त्यांची पळवापळवी थांबली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शिवार गार्डनच्या जागेवरून वाद : दुसरी अट मीरा–भाईंदरमधील शिवार गार्डनच्या जागेशी संबंधित आहे. ही जागा शिंदे गटाच्या एका स्थानिक नेत्याने महापालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतल्याचा आरोप मेहता यांनी केला. ही जागा तात्काळ महापालिकेला परत देऊन तेथे नागरिकांसाठी सार्वजनिक टाउन पार्क विकसित करावे, अशी मागणी त्यांनी केली. या मुद्द्यावरून भाजप–शिवसेना संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
जागावाटपावरून तणाव: जागावाटपावर बोलताना मेहता यांनी भाजपची ताकद अधोरेखित केली. भाजपने ६६ जागा स्वतःसाठी निश्चित केल्या असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८ जागा देण्याचे ठरले आहे. उर्वरित २१ जागांपैकी शिवसेनेला केवळ १० ते १२ जागा देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. मात्र, शिवसेनेला ही संख्या मान्य होण्याची शक्यता कमी आहे. अटी मान्य न झाल्यास भाजप सर्व ८७ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल, असा अंतिम इशाराही मेहता यांनी दिला.
सरनाईक–मेहता बैठकीकडे लक्ष : या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत अटींवर तोडगा निघतो की महायुतीचा तिढा अधिकच वाढतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.






