मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या पक्षासाठी १४ ते १५ जागांची मागणी केली आहे. रिपाइंचे संख्याबळ कमी असले, तरी ज्यांच्या सोबत आरपीआय असतो, त्यांचेच सरकार सत्तेत येते, असा दावा करत त्यांनी महायुतीकडून सन्मानजनक जागा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली. माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, "आरपीआय पूर्वी काँग्रेससोबत होता तेव्हा काँग्रेसचे सरकार आले. नंतर शिवसेनेसोबत गेल्याने युतीचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्याच पाहिजेत." तसेच, मुंबईतील राजकीय स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, मुंबईत ४० टक्के मराठी आणि ६० टक्के परप्रांतीय मतदार आहेत. मराठी मतदारांमध्येही महायुतीला मतदान करणारे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे मनसेसोबतची युती उबाठा गटाला फळणार नाही, असा दावाही त्यांनी केला.