टोकियो : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच जपानमध्ये एका भीषण अपघाताने शोककळा पसरली आहे. जपानमधील एका मुख्य महामार्गावर खराब हवामान आणि जोरदार बर्फवृष्टीमुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या विचित्र अपघातानंतर वाहनांना भीषण आग लागली, ज्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, तर २६ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जपानमध्ये सध्या वर्षा अखेरच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. यामुळे मोठ्या संख्येने नागरिक आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी आणि घरी जाण्यासाठी बाहेर पडले होते. परिणामी, महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, अचानक झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे रस्ते निसरडे झाले आणि वेगवान वाहने चालकांचा ताबा सुटून एकमेकांवर आदळली. या धडकेनंतर काही क्षणातच गाड्यांनी पेट घेतला आणि महामार्गावर आगीचे लोळ दिसू लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील बर्फामुळे वाहने घसरून हा साखळी अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, अग्निशमन दल पोहोचेपर्यंत अनेक वाहने जळून खाक झाली होती. या दुर्घटनेत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला असून, जखमी झालेल्या २६ प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातामुळे महामार्गावर कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रशासनाकडून तातडीने रस्ता रिकामा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस बर्फवृष्टीचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला असून, नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. सुट्ट्यांच्या उत्साहात झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण जपानमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
७७ वर्षीय महिलेचा मृत्यू, २६ प्रवासी जखमी
जपानची राजधानी टोकियोपासून १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या गुन्मा प्रांतातील प्रीफेक्चरमधील कान-एत्सु एक्सप्रेसवेवर शुक्रवारी रात्री मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. निसरडा रस्ता आणि खराब हवामानामुळे तब्बल ५० हून अधिक वाहने एकमेकांवर आदळली. या भीषण टकरीनंतर गाड्यांनी पेट घेतल्याने संपूर्ण महामार्गावर आगीचे साम्राज्य पसरले होते. या दुर्घटनेत एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत.
एकामागून एक ५० गाड्या आदळल्या; महामार्गावर अग्नितांडव
मुसळधार बर्फवृष्टीमुळे एक्स्प्रेस वेवर दृश्यमानता कमी झाली होती. सुरुवातीला काही ट्रकची एकमेकांना जोरदार धडक बसली, मात्र रस्ता निसरडा असल्याने मागून येणाऱ्या वेगवान गाड्यांना नियंत्रण मिळवता आले नाही. पाहता पाहता ५० हून अधिक वाहने एकावर एक आदळली. या धडकेनंतर भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक वाहनांचा कोळसा झाला. पाच जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जपानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला प्रचंड कसरत करावी लागली. तब्बल सात तासांच्या थरारानंतर आग विझवण्यात यश आले. आश्चर्याची बाब म्हणजे, वाहने पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी, सुदैवाने आगीत होरपळून अधिक जीवितहानी झाली नाही. मात्र, या साखळी अपघाताने एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.