Saturday, December 27, 2025

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या दारात जाऊन तेच सोनं परत मागत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मधून समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी संबंधित उमेदवाराने सोन्याचं वाटप केल्याचा आरोप आहे. मात्र निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर हा उमेदवार थेट मतदारांच्या घरोघरी जाऊन जाब विचारत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. दिलेलं सोनं परत न केल्यास सीसीटीव्ही फुटेजचा उल्लेख करत धमकावण्याचाही आरोप त्याच्यावर होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उमेदवार मतदारांशी बोलताना, तुमच्याकडे सोनं घेतल्याचा कोणताही पुरावा नाही. तुम्ही माझ्या घरी येऊन सोनं नेल्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे, असं म्हणताना दिसत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काहींनी मतदारांनी अशा आमिषांना बळी पडू नये, अशी भूमिका मांडली आहे, तर काहींनी सोनं वाटून मत खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवाराला मतदारांनीच योग्य धडा शिकवल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, मतदारांना आमिष दाखवून निवडणूक प्रभावित करण्याचा हा प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यावर काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >