शत्रुत्वाची भावना

बांगलादेशमधील अराजकता आणि सतत वाढणाऱ्या हिंसाचारामुळे तिथल्या हिंदू अल्पसंख्याक समुदायाचे जीवन संकटात सापडले आहे. गेल्या आठवड्यातील एका घटनेचे पडसाद भारतातही उमटले. बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका येथे घडलेली ही घटना. दीपूचंद्र दास नावाच्या हिंदू तरुणाची जमावाने क्रूरपणे हत्या केली. मृत्यूनंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवून जाळून टाकण्यात आला. या घडलेल्या घटनेनंतर भारतातील हिंदूमध्येही संतापाची लाट पसरली. मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक भागांत बांगलादेश सरकारविरोधात निदर्शने झाली. पण, हे कधी थांबेल? या आशेवर बांगलादेशातील अल्पसंख्याक समाज जीव मुठीत घेऊन जगत आहे. अलीकडेच ढाका येथे शेख हसीना गटाचे कट्टर विरोधक 'इन्किलाब मंच'चे नेते शरीफ उस्मान हादी यांची अज्ञात लोकांनी हत्या केल्यानंतर भीषण हिंसाचार उसळला. या हिंसाचारात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांना लक्ष्य केले गेले. लुटमार, त्यांच्या घरांची जाळपोळ आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे हिंदू समाज भयभीत झाला. तसे पाहू गेल्यास बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांची जी आकडेवारी समोर आली, ती तिथल्या अल्पसंख्याक समाजाची चिंता वाढवणारी आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत अल्पसंख्याक; विशेषत: हिंदू महिलांवरील बलात्काराचे ३४२ गुन्हे नोंदवले गेले. मैमनसिंगमधील दीपू दास याच्या घृणास्पद हत्येच्या घटनेनंतर भारत सरकारने गंभीर दखल घेत बांगलादेश सरकारला सुनावले. रणधीर जयस्वाल यांनी एका धक्कादायक आकडेवारीचा दाखला दिला. बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या कार्यकाळात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या तब्बल तीन हजारांहून अधिक घटनांची नोंद झाली, असे जयस्वाल यांनी सांगितले. बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध पसरलेली शत्रुत्वाची भावना आणि हिंसाचार हा केवळ चिंतेचा विषय नसून तो गंभीर आंतरराष्ट्रीय प्रश्न बनत चालला आहे, हे यावरून दिसून येते.


बांगलादेशाच्या निर्मितीला भारत कारणीभूत असल्याने गेल्या ५० वर्षांपासून भारताचे बांगलादेशसोबत मैत्रीचे संबंध होते. भारताला पूरक असलेली शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी बांगलादेशातील आंदोलकांना चीनकडून छुप्या पद्धतीने रसद पुरवली गेली होती, याचे पुरावे आता समोर येत आहेत. त्यामुळे, विद्यमान सरकारच्या पदराआडून चीनच्या कुरघोड्या सुरू आहेत, हे उघड आहे. भारताबद्दल सहानुभूती बाळगणारा मोहम्मद युनूस यांच्यासारखा नेता सध्या बांगलादेशचा हंगामी पंतप्रधान आहे, असा समज सुरुवातीला होता. पण, शेख हसीना सरकारचे पतन झाल्यापासूनच दोन्ही देशांतील संबंधात कटुता येणे सुरू झाले होते. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' मोहीम यशस्वीरीत्या राबवली. परंतु, शेजारी असलेल्या बांगलादेशाने भारतासोबत व्यापार युद्ध सुरू केले. भारतात आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर शुल्क लावण्याची घोषणा करून बांगलादेशानेच या व्यापार युद्धाची सुरुवात केली. भारताने त्याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशात निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर निर्यातशुल्क लावण्याची घोषणा केली. बांगलादेशाचे एवढ्यात समाधान झाले नाही म्हणून की काय, भारताशी झालेला १८० कोटींचा संरक्षण करार रद्द केला. त्यामुळे, बांगलादेशातील बहुसंख्याक मुस्लीम समाजाचाच नव्हे; तर सरकारचा भारतविरोधी द्वेष जगासमोर आला आहे.


बांगलादेशच्या २०२२ च्या जनगणनेनुसार, बांगलादेशात हिंदू धर्मीय हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धर्मीय आहेत. बांगलादेशातील ६४ पैकी ६१ जिल्ह्यांमध्ये हिंदू धर्मीय राहतात. बांगलादेशातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७.९५ टक्के लोक हिंदू आहेत. भारत आणि नेपाळनंतर बांगलादेशमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाची हिंदू लोकसंख्या असल्याचे मानले जाते. बांगलादेशात पसरलेल्या अत्याचारांच्या सर्वाधिक बळी अल्पसंख्याक हिंदू महिला आहेत. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्यापूर्वी, हिंदूसह धार्मिक अल्पसंख्याकांना जिवंत जाळण्यासारखे भयानक प्रकार वारंवार घडत आहेत, हा चिंतेचा विषय आहे. बांगलादेशातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था हेसुद्धा त्यातील एक कारण आहे. हसीना यांनी भारतात आश्रय घेतला असल्याचा राग म्हणून बांगलादेशातील हिंदूंना टार्गेट केले जात आहे का? या मुद्द्यावर मतांतरे असू शकतात; परंतु, हसीना यांच्याविरोधातील मुख्य राजकीय पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान यांनी ‘हिंदू-मुस्लीम करू नका, ते सगळे बांगलादेशचे नागरिक आहेत,’ असे केलेले वक्तव्य आशादायक आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे रहमान हे ज्येष्ठ पुत्र असून १७ वर्षांनी लंडनहून मायदेशी परतले आहेत. 'हा देश डोंगराळ आणि मैदानी भागातील लोकांचा, मुस्लीम, हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चनांचा आहे. आम्हाला एक सुरक्षित बांगलादेश निर्माण करायचा आहे; जिथे प्रत्येक महिला, पुरुष आणि मूल घराबाहेर पडू शकेल आणि सुरक्षितपणे परत येऊ शकेल', असे रहमान यांचे बांगलादेशी नागरिकांना संबोधून केलेले भाषण चर्चेचा विषय ठरला आहे. बांगलादेशींच्या मनात भारताविरोधातील आणि हिंदू धर्मीयाविरोधातील शत्रुत्वाचा वाढलेला भाव ते कितीपत कमी करतात, हे येणाऱ्या काळात दिसून येईल. बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटनांना केवळ माध्यमाची अतिशयोक्ती किंवा राजकीय हिंसा म्हणून दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही, हे बांगलादेशाला पुन्हा ठणकाणून सांगण्याची हीच वेळ आहे.

Comments
Add Comment

मरता, क्या नहीं करता?

गेल्या विधानसभा निवडणुकांपासून एकत्र येणार होते, ते दोन भाऊ शुक्रवारी अधिकृतरीत्या एकत्र आले. राज्यात बऱ्याच

शेजाऱ्याचे जळते घर

बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये नेहमीच स्फोटक वातावरण असते. हे दोन्ही देश भारताच्या

हवा मुंबईची

वायुप्रदूषणाची अखेर मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली. प्रथम दर्शनी अहवालात कोणत्याही निकषाचे पालन केले नाही

सगळ्यांचेच अंदाज खरे!

मतदानोत्तर चाचण्या, सर्वेक्षणानंतर बांधलेले निवडणुकीचे अंदाजही चुकतात. पण, नगरपालिका आणि नगर परिषदांच्या

अशांत बांगला

१९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी युद्ध करून पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशची निर्मिती केली. पण तो बांगलादेश आज

काँग्रेसचा नारा कितपत खरा?

पक्षाच्या विचारधारेवर आणि नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेऊन पक्षासाठी समर्पितपणे काम करणारा मोठा वर्ग आजही